बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. साहजिकच इंडस्ट्रीत चिंतेचे सावट आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाने गाठले. आता अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. (Alia bhatt tests positive for covid 19) आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर याबाबतची माहिती दिली.
माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. मी लगेच स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. मी सर्वोतोपरी काळजी घेऊन डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करते. तुझ्या प्रेम आणि सहकार्यासाठी आभार. प्लीज सुरक्षित राहा, काळजी घ्या, असे आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे. तत्पूर्वी कार्तिक आर्यन, आमिर खान, आर. माधवन,मनोज वाजपेयी, मिलिंद सोमण, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया, रमेश तौरानी, बप्पी लाहिरी आणि सतीश कौशिक अशा विविध कलाकारांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काही दिवसांपूर्वीच आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाली होती. रणबीर कपूर ब-याच दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये होता. आता त्याची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. चर्चा खरी मानाल तर, गुरूवारी संध्याकाळी आलिया व रणबीर दोघेही डबिंग सेशनसाठी एकत्र आले होते. आलिया व रणबीर दोघेही अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
आलिया सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामध्येच आलियाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्याने याचा परिणाम चित्रपटाच्या चित्रीकरणावर होऊ शकतो. चित्रपटाचे शूटींग काही काळासाठी पुढे ढकलले जाऊ शकते. याव्यतिरिक्त आलिया तिच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘बाहुबली’ फेम एस. एस. राजामौली करत आहेत. तर आलिया या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच ज्युनियर एनटीआर, अजय देवगन आणि राम चरणसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.