कधी कधी जीवन काही अवघड परिस्थितीचा कंटाळा येतो. तेव्हा आपण एक तर त्या परिस्थितीला शरण जातो किंवा तिच्याशी दोन हात करतो. गंगुबाईने तिच्या जीवनात आलेल्या प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आणि ती एक वादळी शक्ती बनली. १५ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता झी सिनेमावर ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर पार पडणार आहे.
संजय लीला भन्साळीचे दिग्दर्शीय कौशल्य आणि आलिया भटच्या सहजसुंदर अभिनयाने हा दर्जेदार चित्रपट तयार झाला आहे. या गंभीर कथानकाला अजय देवगणने साकारलेल्या करीम लालाच्या भूमिकेची साथ लाभली आहे. त्याशिवाय रझियाबाईच्या भूमिकेतील विजयराझ आणि अफसानच्या भूमिकेतील शंतनु महेश्वरी यांच्या अभिनयाने या कथानकाला नवा पैलू लाभला आहे.
या चित्रपटाबद्दल आलिया भट म्हणाली, “माझ्या वाटेला आलेली प्रत्येक भूमिका साकारण्याचा आनंद मी घेतला आहे. ते करताना मला त्यात माझ्या व्यक्तिमत्त्वातील काही अंश सापडले आहे. त्यामुळे मी प्रत्येक भूमिकेशी समरस होऊ शकले. पण गंगुबाई साकारताना मला माझा हा अनुभव विसरून जावा लागला आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सूचना आणि कल्पनेनुसार मला ही व्यक्तिरेखा साकारावी लागली. ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात कठीण भूमिका होती. कारण गंगुबाई एकाच वेळी एक कणखर वादळी व्यक्ती होती आणि त्याचवेळी ती गलितगात्रही होती. तिचं जीवन लोकांपुढे उघडं होतं, पण तिच्या भावना कोणालाच कळल्या नाहीत. त्याहीपेक्षा ही व्यक्तिरेखा मी जी वास्तवातील व्यक्ती आहे, त्यापेक्षा पूर्णपणे भिन्न होती. या गोष्टीमुळे मला माझ्यावरील जबाबदारीची आणि ही भूमिका जगण्याची जाणीव झाली. गंगुबाईचं जीवन हे फार व्यापक होतं आणि मी त्याच्या केंद्रस्थानी होते. ही व्यक्तिरेखा म्हणजे मोठं आव्हान असलं, तरी संजयसर हे मला मार्गदर्शनासाठी सेटवर असल्याने माझं स्वप्न पूर्ण झालं. आता झी सिनेमा वाहिनीवर या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रसारित होत असल्याने व्यापक प्रेक्षकांना गंगुबाईच्या जीवनाची झलक पाहायला मिळेल.”
काठियावाडमधील गंगा या मुलीच्या जीवनाची कथा ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये चित्रीत करण्यात आली आहे. एका विश्वासघातामुळे गंगेचे जीवन उदध्वस्त होते, तेव्हा तिला या नव्या प्रतिकूल वातावरणात जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण त्या संघर्षामुळे मनोबल खच्ची होऊन त्याला बळी जाण्याचे ती नाकारते आणि त्या संघर्षाशी दोन हात करते. तिच्या मनावर चंद्रावरील डागांप्रमाणे व्रण उमटतात, पण बाह्यत: ती सदैव हसतमुख राहते. किंबहुना तिच्या वाट्याला आलेल्या दु:खातूनच ती बळ मिळविते आणि गंगुबाईच्या रूपाने आपल्या आजुबाजूच्या लोकांचा आवाज बनते.