इंटरनेट, कॉलिंग सोशल मीडियाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रोज सायबर क्राइमबद्दल काही ना काही ऐकायला मिळतं. यातच आता हॅकरने अभिनेत्री आलिया भटची आई सोनी राजदान यांना आपल्या रॅकेटमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या रॅकेटचा बळी ठरल्या नाही. सोनी राजदान एका मोठ्या स्कॅमपासून थोडक्यात बचावल्या आहेत. सोनी राझदान यांनी घडलेला प्रकार इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितला आहे. सध्या त्यांची इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनी राजदान यांनी पोस्टमधून त्यांनी फसवणुकीची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहलं, 'आपल्या आजूबाजूला खूप मोठे रॅकेट सुरू आहे. एका व्यक्तीने मला फोन केला आणि म्हणाला की, दिल्ली कस्टममधून बोलतोय. त्यांनी मला सांगितले की, मी काही बेकायदेशीर ड्रग्सची ऑर्डर दिली आहे. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे आधार कार्ड क्रमांक मागितला. ज्याप्रमाणे मला कॉल आला, त्याचप्रमाणे इतरही कोणाला तसा फोन आलाय का?, याची मी माझ्या आसपास चौकशी केली. तसाच फोन कॉल माझ्या ओळखीतल्या अनेकांना आल्याचं मला समजलं'.
पुढे त्यांनी लिहलं, 'हे लोक आपल्याला फोन करून घाबरवतात, धमकावतात आणि अशाप्रकारे बोलून आपल्याकडून ते बक्कळ पैसा काढतात. मुख्य गोष्ट अशी की, कोणीही त्यांच्या बोलण्यात अडकू नका किंवा त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. माझ्या माहितीत कोणीतरी त्यांच्या बोलण्यात अडकले आहेत आणि त्यांना खूप पैसे ट्रान्सफर केले आहेत. तो व्यक्ती खूप टेंशनमध्ये आहे'. इतरांसोबत असं काही घडू नये, यासाठी मी पोस्ट शेअर करत असल्याचंही सोनी यांनी सांगितलं.
पुढे सोनी यांनी लिहलं,' जेव्हा त्या लोकांनी माझा आधार कार्ड नंबर मागितला तेव्हा, मी त्यांना म्हणाले की थोड्यावेळात डिटेल्स देते. त्यानंतर त्यांनी मला कॉल केला नाही. पण माझ्यासाठी हा सगळा प्रकार खूपच भनायक आणि घाबरवणारा होता. अशा प्रकारचा कोणाही कॉल तुम्हाला आला तर तुम्ही त्यांना प्रतिसाद देऊ नका. जास्त वेळ फोनवर बोलू नका. हा नंबरही सेव्ह करू नका. तत्काळ पोलिसांची मदत घ्या. मी अशा तीन लोकांना ओळखते. ज्यांना अशाप्रकारचे फोन येऊन गेले आहेत. यामुळेच तुम्ही सावधान राहा आणि सुरक्षित राहा',असं सोनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.