अलका कुबल या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. 'माहेरची साडी' या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अलका कुबल यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या 'नो फिल्टर' या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये त्यांनी सिनेकारकीर्द, खासगी आयुष्य आणि राजकीय संबंधावर अनेक खुलासे केले आहेत.
लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये अलका कुबल यांनी बाळासाहेब ठाकरे, अजित पवार, शिंदे आणि फडणवीस यांच्याशी आपुलकीचं नात असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, ' मी बाळासाहेबांना अनेकदा मातोश्रीवर भेटले. उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिणींना भेटले. राज ठाकरेंनाही भेटलेय. माझं एकाच पक्षाशी असं काही ठरलेलं नाही. मत तर आपण ज्यांना द्यायचं त्यांना देतोच. पण सगळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत'.
पुढे त्या म्हणाल्या, 'अजित पवार म्हणा, शिंदे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. आता आमचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते खूप सहकार्य करतात. शासनाने खूप चांगली कामे केली आहेत. मला असं वाटतं जर कोणी चांगलं काम केलं असेल तर कौतुक करायला पाहिजे'.
अलिकडेच अलका कुबल यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. कलर्स मराठीवरील विनोदी शो 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' मध्ये पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात अभिनेता भरत जाधव आणि अलका कुबल आठल्ये दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत. अलका यांना २०१४ साली त्यांना कला साधना-कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप, माझी आई काळुबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. हिंदीमधल्या शिर्डीचे साईबाबा या चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे.