सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरू आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण नुकतेच दीपिका पादुकोण-रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा-निक जोनास, कपिल शर्मा-गिन्नी चतरथ यांसारखे सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आणि आता प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिकच्या मुलीचे लग्न झाले. अलका गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडचा भाग असून तिने एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. त्यामुळे तिच्या मुलीच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेकजणांनी हजेरी लावली असेल असे तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचे आहे. अलका याज्ञिकच्या मुलीचे लग्न 12 डिसेंबरला झाले असून या लग्नाला केवळ बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने उपस्थिती लावली. ही अभिनेत्री अलकाची खूपच जवळची मैत्रीण आहे.
अलका याज्ञिकच्या मुलीचे नाव सायशा असून तिने तिचा प्रियकर अमित देसाईसोबत लग्न केले. अमित आणि सायशा यांचा साखरपुडा गेल्या वर्षी 25 डिसेंबरला झाला होता. सायशाची आई ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका असली तरी सायशाला या करियरमध्ये रस नाहीये. तिचे अंधेरीत हॉटेल असून तिने आणि तिच्या बालमैत्रिणींनी मिळून हे हॉटेल सुरू केले आहे, तिने लंडन ऑफ स्कूल ऑफ मार्केटिंगमधून एमबीए केले आहे.
सायशाला सुरुवातीला अभिनयक्षेत्रात करियर करायचे होते आणि त्यामुळे तिने अभिनयाचे धडे देखील गिरवले होते. पण या क्षेत्रात करियर करणे खूप कठीण आहे हे तिच्या लक्षात आल्याने ती या क्षेत्रापासून दूर गेली.
सायशाचे लग्न धुमधडाक्यात झाले असून तिने या लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. विशेष म्हणजे तिच्या लग्नात बॉलिवूडमधील पूनम ढिल्लोन हीच केवळ एक अभिनेत्री दिसली. या लग्नात अलका याज्ञिकने परफॉर्मन्स सादर केला. तिने तिच्या मुलीसाठी अनेक गाणी गायले आणि त्यातील एक साँग देखील तिच्या मुलीसाठी डेडिकेट केले होते. सायशाचे लग्न 12 ला झाले असले तरी लग्नाच्या आधीचे विधी 10 आणि 11 डिसेंबरला झाले. संगीत आणि हळदी सेरेमनी देखील धुमधडाक्यात झाली होती.