Join us  

सर्वच बाजूंनी फक्त निराशा

By admin | Published: March 13, 2016 2:20 AM

संगीतकार म्हणून बॉलीवूडमध्ये यश मिळविणाऱ्या हिमेश रेशमिया याला असे वाटले की, तो पडद्यावर हीरो बनू शकतो. हिमेशला पडद्यावर नायकाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर असे वाटते की

संगीतकार म्हणून बॉलीवूडमध्ये यश मिळविणाऱ्या हिमेश रेशमिया याला असे वाटले की, तो पडद्यावर हीरो बनू शकतो. हिमेशला पडद्यावर नायकाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर असे वाटते की, अखेर कुठपर्यंत तो हीरो बनण्याचा आपला छंद पूर्ण करीत राहणार आहे? त्याचा नवा चित्रपट तेरा सुरूर पाहूनही हाच प्रश्न पडतो आणि उत्तर कुठेच मिळत नाही. या वेळी हिमेशने सस्पेन्स - थ्रिलर चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला आहे. यात लव्ह स्टोरीचा तडकाही आहे. हे कथानक रघू (हिमेश) आणि तारा (फरहा करीमी) यांचे आहे. रघू हा गँगस्टर आहे तर तारा गायिका आहे. दोघांच्या लव्हस्टोरीत तेव्हा एक निर्णायक वळण येते जेव्हा तारा रघूशी नाराज होऊन एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आयर्लंडला जाते, तर तिथे पोलीस ताराला ड्रग्ज बाळगण्याच्या आरोपात पकडतात. ताराला सात वर्षांचा तुरुंगवास होतो. ही माहिती रघूला मिळताच तो विदेशात जातो आणि ताराला सोडवण्याचा प्रयत्न करू लागतो. यात त्याला यश मिळत नाही. त्यानंतर रघू तिथे तुरुंगात असलेल्या एका भारतीय कैद्याला भेटतो. या कैद्याच्या मदतीने रघू योजना आखतो की, कशा प्रकारे ताराला तुरुंगातून सुरक्षित बाहेर काढता येईल. ही योजना यशस्वी होते. रघू त्या व्यक्तीलाही शिक्षा देण्यात यशस्वी होतो, ज्याने ताराला या आरोपात फसविलेले असते. उणिवा : हिमेश रेशमिया हा या चित्रपटाचा नायक तर आहेच; पण निर्माताही आहे. संगीत आणि गायन हा तर त्याचा प्रांतच आहे. पण, या तिन्ही भूमिकांत तो निराश करतो. निर्माता म्हणून त्याने अतिशय दुबळे कथानक निवडले आहे. यात प्रत्येक फे्रममध्ये स्वत:लाच प्रभावीपणे दाखविणे हा उद्देश दिसून येतो. त्यामुळे कथानक भरकटल्यासारखे वाटते. नायक म्हणून एवढ्या चित्रपटांत काम केल्यानंतरही हिमेश डायलॉग बोलणे शिकला नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. या वेळी तर तो पडद्यावर काहीच प्रभाव पाडू शकलेला नाही. चित्रपटातील प्रत्येक दृश्य हे एखाद्या इंग्रजी चित्रपटावरून घेतलेले आहे असे वाटते. दुबळे कथानक आणि पटकथा यासोबतच हिमेशचे नायक असणे, ही सर्व कारणे चित्रपटाला बुडविण्यात कारणीभूत ठरतात. संगीतकार आणि गायक म्हणून हिमेश काही वेगळे करेल अशी अपेक्षा होती. पण, ही अपेक्षा फोल ठरली आहे. चित्रपटात नसिरुद्दीन यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यालाही योग्य भूमिका देण्यात आलेली नाही. अनेक वर्षांनंतर शेखर कपूर पडद्यावर परत दिसले आहेत. पण, त्यांच्या भूमिकेतही फारसा दम नाही. आयरिश वकिलाच्या भूमिकेत मोनिका डोगराचा पडद्यावरील वावरही तसा मर्यादितच आहे. हिमेशची जोडीदार फरहाला कतरिना स्टाईल दाखविण्याचा प्रयत्नही तसा नाटकी वाटतो. फरहाच्या आईच्या भूमिकेत शहनाज पटेल यांनाही अभिनयाची फारशी संधी दिलेली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे शरवन अहान दिग्दर्शकाच्या भूमिकेतही हिमेशलाच खूश करण्याच्या प्रयत्नात दिसतात. एकूणच काय तर चित्रपट बॉक्स आॅफिसवर कसा चालणार हे वेगळे सांगायला नको! का पाहावा? कोणतेही खास कारण नाही. का पाहू नये? हिमेश रेशमिया हीरो असल्यामुळे.वैशिष्ट्ये : चित्रपटात असणारे विदेशातील चित्रीकरण चांगले आहे; याशिवाय जमेच्या बाजू अशा नाहीतच.