adipurush controversy row : 'आदिपुरूष' चित्रपटावरून देशाचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनेक संघटनांनी तथा राजकीय पक्षांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) देखील या वादात उडी घेतली असून चित्रपटावर बंदी घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि ओटीटी स्क्रिनिंगवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
या पत्रात संस्थेच्या वतीने म्हटले, "चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, डायलॉग लेखक मनोज मुंतशीर शुक्ला आणि निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दाखल करावा." खरं तर हा बहुभाषिक चित्रपट रामायणावर आधारित आहे, ज्याच्या विरोधात सोमवारी देशातील विविध शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. 'आदिपुरूष' चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता केंद्र सरकारने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) हा निर्णय घेतला असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तसेच कोणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
१६ जून २०२३ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष'मध्ये अभिनेता प्रभास, अभिनेत्री क्रिती सनॉन आणि कलाकार सैफ अली खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, तर चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.
विरोध अन् प्रचार 'आदिपुरूष' सुसाटआदिपुरूष चित्रपटाला वाढत चाललेला विरोध चित्रपटाला फायदा करून देत असल्याचे दिसते. कारण चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी काही संवाद बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह चित्रपट दाखवण्यात येणार आहे. खरं तर राजकीय पक्ष देखील 'आदिपुरुष'वरून रिंगणात उतरले आहेत. अनेकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.