Join us

एकूण सगळाच सावळा गोंधळ..!

By admin | Published: April 22, 2017 3:05 AM

सयाजी शिंदे, संजय मोने, भारत गणेशपुरे, शंतनू मोघे अशी तगडी स्टारकास्ट असल्यावर, त्या चित्रपटाकडून किमान अपेक्षा असणारच. मात्र, ‘शूर आम्ही सरदार’ हा चित्रपट

- राज चिंचणकर

मराठी चित्रपट - ‘शूर आम्ही सरदार’सयाजी शिंदे, संजय मोने, भारत गणेशपुरे, शंतनू मोघे अशी तगडी स्टारकास्ट असल्यावर, त्या चित्रपटाकडून किमान अपेक्षा असणारच. मात्र, ‘शूर आम्ही सरदार’ हा चित्रपट ती अपेक्षा पूर्णत्वास नेत नाही. अर्थात, यात या कलावंतांचा दोष नाही, तर चित्रपटाची एकूणच कमकुवत पायावर झालेली उभारणी यासाठी मारक ठरली आहे.परदेशी स्थायिक असलेल्या गणेश लोके या तरुणाने एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी या चित्रपटाचा घाट घातला आहे. मात्र, कथा, पटकथा, संवाद, गीते, निर्मिती आणि प्रमुख भूमिका असे ‘सबकुछ’ करण्याच्या नादात त्याच्या हातून हा चित्रपट वाहावत गेला आहे. वास्तविक, चित्रपट निर्मितीसाठी लागणारी प्रबळ इच्छा या तरुणाकडे आहे, परंतु सगळ्याच जबाबदाऱ्या एकहाती घेतल्यावर त्याचे जे काही होईल, त्याचे दर्शन या चित्रपटात घडते. दहशतवाद्यांच्या विरोधात छेडलेल्या चकमकीत मेजर गणेश जखमी होतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. तिथे त्यांची कॉलेजची मैत्रीण एसीपी सोनाली व त्यांचा कॉमन मित्र सलीम यांची पुनर्भेट होते. दरम्यान, एसीपी सोनालीच्या कार्यक्षेत्रात विषारी दारूचा अड्डा चालवणाऱ्या सदानंद माळी याच्याशी तिचा संघर्ष होतो आणि त्यात दोन जण मारले जातात. याच ओघात जखमी मेजर गणेश व सोनाली यांचे, तसेच सलीम व गणेशवर उपचार करणारी हॉस्पिटलची डॉक्टर यांचे प्रेम जमते. त्यानंतर, सीमेवर दहशतवादी कारवाया होत असल्याचे मेजर गणेशला कळते आणि मग हा मेजर, एसीपी सोनाली व सलीम यांच्यासह दहशतवाद्यांचा बीमोड करतो, अशी ही एकंदर कथा आहे. ही कथा वाचल्यावर कशाचा कशाला थांगपत्ता नाही हे सहज कळते. चित्रपट पाहतानाही याहून वेगळे काही घडत नाही. सगळ्या योगायोगाच्या गोष्टी यात जुळवून आणल्या आहेत. चित्रपटाचा पायाच भुसभुशीत असल्यावर त्यावरची इमारत भक्कम असण्याची शक्यताच निकालात निघते. तरीही या सर्व पार्श्वभूमीवर, दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत, हा चित्रपट बऱ्यापैकी निदान उभा तरी राहू शकेल यासाठी परिश्रम घेतले आहेत, पण पटकथेची साथ न मिळाल्याने, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले आहेत. या चित्रपटातल्या थोराड कलावंतांना ‘कॉलेजकुमार’ म्हणून स्वीकारणे फारच जड जाते. सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे अशा अनुभवी आणि सीनिअर कलावंतांनी हा चित्रपट स्वीकारताना नक्की कोणता विचार केला असेल, हा प्रश्न सुटता सुटत नाही. शंतनू मोघे याने सलीमच्या भूमिकेत डॅशिंग काम करण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद्याच्या भूमिकेत चक्क संजय मोने आहेत आणि हेच काय ते चित्रपटातले वेगळेपण आहे. गणेश लोके (मेजर गणेश) आणि हर्षदा पाटील (एसीपी सोनाली) हे या चित्रपटाचे मुख्य नायक व नायिका आहेत, एवढेच काय ते त्यांच्याबद्दल सांगता येईल. एकूण सगळाच सावळागोंधळ असलेल्या या चित्रपटाविषयी बाकी सांगण्यासारखे काही नाही. - चित्रपटाचा पायाच भुसभुशीत असल्यावर त्यावरची इमारत भक्कम असण्याची शक्यताच निकालात निघते. तरीही या सर्व पार्श्वभूमीवर, दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत, हा चित्रपट बऱ्यापैकी निदान उभा तरी राहू शकेल यासाठी परिश्रम घेतले आहेत.