प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमधील उदयपूरमध्ये हत्या करण्यात आली. या हत्येचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हल्लेखोरांनी शिवणकाम व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्यांच्यावर चाकू आणि तलवारीने हल्ला केला आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत(Kangana Ranaut)ने देखील या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कंगना राणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर पोस्ट शेअर करत उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकासोबत घडलेल्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये कंगनाने शिवणकाम करणाऱ्या कन्हैयालालचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कंगनाने लिहिले की,नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्यामुळे या निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि जिहादींनी हा व्हिडीओ केला. ते लोक दुकानात जाणीवपूर्वक घुसले. त्यानंतर घोषणा देऊ लागले.
पुढे कंगनाने आणखी एक स्टोरी शेअर केली आहे. यात अभिनेत्रीने त्या दोन व्यक्तींचा फोटो शेअर केला आहे. ज्यांनी कन्हैयालालची हत्या केली. हा फोटो शेअर करत कंगना म्हणाली, कन्हैयालालची क्रुर हत्या केली आणि त्यानंतर फोटोसाठी अशी पोझ दिली. त्यांनी बरेच व्हिडीओ शूट केले. या घटनेनं मला हादरवून टाकलं आहे. ते व्हिडिओ पाहण्याची माझ्यात हिंमत नाही.
कंगना राणौतने शेअर केलेल्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.