टीव्हीवरचं रोमँटिक कपल अली गोनी (Aly Goni) आणि जॅस्मीन भसीन (Jasmin Bhasin) सध्या चर्चेत आहेत. बिग बॉस १४ मध्ये दोघांची भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. अलीसोबतच्या रिलेशनशिपमुळे जॅस्मीनला ट्रोलही करण्यात आलं. मात्र तिने धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. नुकतंच दोघांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केल्याचा जॅस्मीनने खुलासा केला. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. या चर्चांवर जॅस्मीनने प्रतिक्रिया दिली आहे.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत जॅस्मीन भसीन म्हणाली,"आम्हाला या चर्चा ऐकून खूप हसू येत आहे. यात कृष्णा मुखर्जीचं नाव का जोडलं जात आहे हे आधी आम्हाला कळलं नाही. आम्ही जेव्हा लग्नाचं प्लॅनिंग करु तेव्हा सर्वांना समजेलच. आम्ही स्वत:च ही बातमी सांगू. माझी सर्व चाहत्यांना विनंती आहे की या चर्चा पसरवू नका. सध्या आम्ही दोघंही करिअरवर लक्ष देत आहे."
काही दिवसांपूर्वी 'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी एका मुलाखतीत म्हणाली की अली आणि जॅस्मीन कदाचित याचवर्षी लग्न करतील. त्यावरुनच दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र सध्या त्यांचा लग्नाचा प्लॅन नाही हे जॅस्मीनने स्पष्ट केलं आहे.
अली आणि जॅस्मीन गेल्या पाच वर्षांपासून डेट करत आहेत. अली 'लाफ्टरशेफ' मध्ये दिसला होता. तर जॅस्मीन पंजाबी सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे.