ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुख: आणि निषेध व्यक्त केला आहे. देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना बॉलिवूड सेलिब्रेटिंनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. बॉलिवूड बादशहा शाहरुख खाननेदेखील ट्विटरच्या माध्यमातून घटनेचा निषेध करत दुख: व्यक्त केलं आहे. याआधी अक्षय कुमारनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध करत संताप व्यक्त केला होता.
आणखी वाचा
‘निर्दोष लोकांच्या मृत्यूनं मी दु:खी झालो आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना’, असं ट्विट शाहरुख खानने केलं आहे.
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत.
कसा झाला हल्ला ?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (11 जुलै ) ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.