- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २० - ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख यांची आज (२० ऑक्टोबर) जयंती.
अमर शेख यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल तर आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात २० ऑक्टोबर १९१६ रोजी जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०- ३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला (१९४७). स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी , पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्याकाही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली.
प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.
लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे (२००७).
२९ ऑगस्ट १९६९ साली इंदापूर येथे त्यांचे अपघाती निधन झाले.
सौजन्य : मराठी विश्वकोश