अॅमेझॉन प्राईम हा भारतातील चर्चित आणि सर्वाधिक पाहिल्या जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. नवे नवे मोठ्या बॅनरचे सिनेमे आणि वेबसीरिज रिलीज करणा-या या ओटीटी प्लॅटफॉर्मने फार कमी वेळात स्वत:चे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. लवकरच तांडव आणि फॅमिली मॅन 2 या दोन बहुप्रतिक्षीत सीरिज या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. मात्र तत्पूर्वी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने असे काही केले की, प्रेक्षकही हैराण झालेत.
होय, प्राईम व्हिडीओ आपल्या लोगोच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. PRIME या शब्दाच्या इंग्रजी स्पेलिंगमधून M व E हे दोन अक्षरे कंपनीने गाळली आहेत. इतकेच नाही. आपल्या इन्ट्रोमधूनही ही दोन अक्षरे गायब केली आहेत. Fairytale comes to life असे प्राईम व्हिडीओने आपल्या इन्ट्रोमध्ये लिहिले आहे. यातूनही एम व ई ही दोन इंग्रजी अक्षरे गाळण्यात (Fairytale co s to life) आली आहेत. या पोस्टसोबत अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने #WhereIsMEया हॅशटॅगला सुरुवात केली आहे. आता हे का? यामागचा उद्देश काय? हे आम्हाला ठाऊक नाही. पण तूर्तास सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. चाहते #WhereIsME या हॅशटॅगसोबत वेगवेगळे मीम्स, कमेंट्स शेअर करत आहेत.
काहींच्या मते, प्राईम व्हिडीओ एखादा नवा प्रोजेक्ट घेऊन येतोय आणि हा बदल या प्रमोशनचा भाग आहे. खरे काय, ते लवकरच कळेल. तोपर्यंत यावरच्या मजेदार कमेंट्स पाहायलाच हव्यात.