कलाकार: अमेय वाघ, वैदेही परशुरामी, प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे, समीर चौघुले, केयुरी शाह, सुनिल अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार, जयवंत वाडकरदिग्दर्शन व छायांकन – महेश लिमयेनिर्माते – पुनित बालन स्टार : चार स्टार शैली : रोमँटिक कॉमेडी
संत कबीर म्हणतात, ‘पोथी पढी, पढी जगमुआ, पंडित भया न कोय, ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय!’ प्रेम ही एकमेव भावना माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकते. जगदिश तात्या काळण नावाच्या एका तरुण मुलाच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होते आणि त्याचं आयुष्य कसं बदलतं हे सांगणारा सिनेमा म्हणजे ‘जग्गु आणि जुलिएट’. आजवर साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळ्या धाटणीची भूमिका अमेय वाघच्या वाट्याला आली आणि त्याने अक्षरशः त्या भूमिकेचं सोनं केलंय. सिनेमाच्या सुरुवातीला अमेय त्याच्या भूमिकेचा आगरी बाज संपूर्ण सिनेमाभर सांभाळू शकेल का? अशी शंकेची पाल चुकचुकते पण ते पात्र अमेयने इतकं आत्मसात केलंय की, वर्सोवाच्या कोळीवाड्यातच तो लहानाचा मोठा झाला असावा असं वाटतं. तर वर्सोवाच्या कोळी वाड्यात रहाणारा जग्गु आणि अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये लहानाची मोठी झालेली जुलिएट यांची उत्तराखंडमध्ये भेट होते. त्या भेटीत काय घडतं आणि देवभूमीत या दोघांच्या प्रेमाला देवाचा कौल मिळतो का याची गोष्ट उलगडणारा सिनेमा म्हणजे ‘जग्गु आणि ज्युलिएट’!
एका टूरवर भेटलेली काही अतरंगी माणसं त्यांच्या वैयक्तिक आणि परस्पर नातेसंबंधांवरही हा सिनेमा भाष्य करतो. प्रवीण तरडे, अविनाश नारकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे, समीर चौघुले, केयुरी शहा, सुनिल अभ्यंकर, रेणूका दफ्तरदार आणि अर्थात् ऋषिकेश जोशी या सगळ्यांनी आपापल्या भूमिकेची मर्यादा जाणून काम केलं आहे. प्रसंगांची गरज ओळखून प्रत्येकाने आपलं अभिनय कौशल्य वापरलं आहे, त्यामुळे एखादा पुष्पगुच्छ जितका सुरेख दिसतो, तसाच हा सिनेमा दिसतो. त्यात समीर चौघुले, रेणुका दफ्तरदार यांचा वावर चेहऱ्यावर कायम हसू फुलवत राहतो. प्रवीण तरडेनीसुद्धा त्याच्या भूमिकेवर स्वतःची छाप उमटवली आहे. संपूर्ण सिनेमातला वैदेहीचा वावर आल्हाददायक आहे. तिच्या भूमिकेचा आलेख एकरेषीय किंवा चढता नाहीये, तर तिचा आलेख कार्डिओग्रामसारखा चढउताराचा, पण तो प्रत्येक चढउतार वैदेहीने अभिनयाच्या ताकदीवर समर्थपणे निभावला आहे. अमेय आणि वैदेही या दोघांनीही भूमिकेला पूर्ण न्याय दिला असला, तरी त्यांच्यातली प्रेमकहाणी आणखी खुलवली असती, तर सिनेमा आणखी वेगळ्या उंचीला गेला असता असं वाटतं.
नातेसंबंध हा सिनेमाचा स्थायीभाव आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर नाती किती गरजेची असतात, ती नाती कशी जपायची असतात याचा वस्तूपाठ हा सिनेमा आपल्याला घालून देतो. सिनेमातले काही प्रसंग अक्षरशः मनावर कोरले जातात. आयुष्यातलं वडिलांचं महत्त्व समजावत असताना जग्गु आणि जुलिएटचा संवाद डोळ्यात पाणी उभं करतो. याच प्रसंगाच्या शेवटी जुलिएटला आपण जग्गुच्या प्रेमात पडल्याची जाणीव होते. हा प्रसंग सुरु होतो तेव्हा आजूबाजूला प्रचंड धुकं दाखवलंय, आणि जेव्हा तिला आपल्या प्रेमाची जाणीव होते, तेव्हा मात्र ते धुकं पूर्णतः विरलेलं आहे. सिनेमातला हा डिरेक्टर्स शॉट अप्रतिम आहे. सिनेमा सुरु झाला की कॅमेरा आपल्याला हात धरुन थेट उत्तराखंडमध्ये घेऊन जातो, कारण कॅमेरामागे एक सिद्धहस्त सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक आहेत... अर्थात महेश लिमये. सिनेमाची प्रत्येक फ्रेम डोळ्यांना आनंद देणारी आणि सुखद आहे. कुठेही बटबटीतपणा किंवा भपकेबाजपणा दिसत नाही. साधेपणातलं सौंदर्य टिपण्यात महेश लिमयेंचा हात कोणीही धरु शकत नाही. एखादं सुंदर निसर्गचित्र पहावं तसा भास संपूर्ण सिनेमा पहाताना होत रहातो.
सिनेमाचे संवाद हे सिनेमाचं खूप मोठं बलस्थान आहेत. जग्गूच्या संवादातलं खुसखुशीत यमक सिनेमाची लज्जत वाढवतं, तर कधी ऋषिकेश जोशी यांच्या संवादातलं सार विचार करायला भाग पाडतं. बंजी जंपिंग करताना अमेयने त्या प्रसंगात जी काही धम्माल केली आहे, ती थिएटरमध्येच जाऊन अनुभवण्यासारखी आहे. अमेय खाली उडी मारतो, पण ती उडी मारताना त्याने जे काही केलंय, ते त्या सीनला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं.
हा सिनेमा जर पुष्पगुच्छ असेल तर संगीत हा या सिनेमचा सुगंध आहे. अजय-अतुलने नेहमीप्रमाणेच सिक्सर मारला आहे. वेगवेगळ्या मूडची गाणी तुम्हाला या सिनेमात ऐकायला मिळतील... आणि त्यातलं ‘भावी आमदार’ हे गाणं गुणगुणत प्रेक्षक घरी जातील यावर पैज लावता येईल, इतकं ते गाणं दमदार झालंय. या गाण्याच्या निमित्ताने अतुल गोगावलेची गायक म्हणून असलेली रेंज किती अफाट आहे याची प्रचिती येते. गल्लीबोळात सध्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरु आहे, आणि कोण भावी आमदार याचे तर्कवितर्क लावले जात असताना आलेलं हे गाणं म्हणजे ‘मौके पे चौका’च म्हणावं लागेल. निवडणूकांच्या प्रचारात हे गाणं नक्की वाजणार.
संगीतासोबतच पार्श्वसंगीत ही या सिनेमाची खूप मोठी जमेची बाजू आहे. सिनेमाचा संपूर्ण मूड या पार्श्वसंगीताने सांभाळून ठेवला आहे, आणि त्यामुळे सिनेमा पहाताना कधीही कानावर हात ठेवण्याची वेळ येत नाही, तर डोळ्यांनी सौंदर्य टिपत असताना, कानही त्या निसर्गसौंदर्याचा आवाज साठवत रहातात. साउंड डिझाईन करताना अनमोल भावेंनी प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार केलाय, फॉली साउंडचा फार समयोचित आणि योग्य वापर त्यांनी केलाय, त्यामुळेच शांततेलाही स्वतःचा स्वर असतो, याची जाणीव हा सिनेमा पहाताना येते.
गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होती, अनेक पोस्ट्स आणि व्हिडिओजच्या माध्यमातून सिनेमा सतत समोर येत होता, त्यामुळे अर्थातच तो पाहण्याची उत्सुकता होती. बाकी आता ‘व्हॅलेंटाईन्स डे’ जवळ आलाय, त्यामुळे तो दिवस साजरा करण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात आपल्या जग्गू किंवा जुलिएटसोबत हा सिनेमा पहायला हरकत नाही.