बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी (Amrish Puri ) आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील. आज (22 जून ) अमरीश पुरी यांचा वाढदिवस. (Amrish Puri Birthday Special) 22 जून 1932 रोजी जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी 400 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. खरं तर इतर अभिनेत्यांसारखेच तेही हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती.
अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत आले. पण पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले. तुझा चेहरा हिरोसारखा नाही, असं म्हणून निर्मात्यांनी अमरीश पुरी यांना परत पाठवलं. यानंतर अमरीश यांनी विमा विभागात नोकरी धरली. अर्थात त्यांनी अॅक्टिंग सोडली नाही. ते थिएटरकडे वळले. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग हेही अमरीश यांच्या कामाच्या प्रेमात पडले होते.अमरीश पुरी पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारत असले तरी ख-या आयुष्यात ते फार शांत स्वभावाचे होते. त्यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमिर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.
‘जबरदस्त’ या 1985 साली प्रदर्शित सिनेमाच्या निमित्ताने आमिर खान (Aamir Khan) आणि अमरीश पुरी यांची गाठ पडली होती. पण या सिनेमावेळी असं काही घडलं की, या सिनेमानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. अगदी अमरीश पुरी आहेत, असे अनेक सिनेमेही आमिरने नाकारल्याचे ऐकायला मिळतं.
‘जबरदस्त’ या सिनेमातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाला होता. ‘जबरदस्त’ सिनेमात अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमिर या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक होता.
‘जबरदस्त’ या सिनेमाचं दिग्दर्शन आमिरचे काका नासिर हुसेन यांनी केलं होतं. या सिनेमाच्या एका सीनचं शूटींग सुरु असताना आमिर अमरीश यांना काही सूचना करत होता. मात्र अमरीश यांनी आमीरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. परंतु आमिर त्यांना वारंवार सूचना करत राहिला.
मग काय? आमिरने लावलेला तगादा पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि ते सर्वांसमोर आमिरवर संतापले. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षातही आली आणि त्यांनी आमिरची माफीही मागितली. मात्र आमिर तो प्रसंग कधीच विसरू शकला नाही. त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत कधीच काम केलं नाही.