अमित साध (Amit Sadh) आणि सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी ‘काई पो चे’ या सिनेमातून डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती. आज सुशांत आपल्यात नाही. सुशांतच्या निधनाला 2 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे, पण अद्यापही अमित सुशांत या नावानेच भावुक होतो. अलीकडे एका मुलाखतीत अमित सुशांतबद्दल भरभरून बोलला.चेतन भगतशी त्याच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमितने अनेक आठवणी सांगितल्या. शिवाय एक धक्कादायक खुलासाही केला...
आम्ही प्रियकरासारखे झालो होतो...‘काई पो चे’ करताना आम्ही दीड वर्ष एकमेकांसोबत घालवलं. मी, सुशांत व राजकुमार राव आम्ही खूप चांगले मित्र झालोत. अगदी प्रियकरांसारखे होतो, अशातच जेव्हा सुशांतच्या निधनाची बातमी आली आणि मला मोठा धक्का बसला होता. सुशांतला भेटायचं होतं. मी त्यासाठी प्रयत्न करत होतो. मी त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तिकडून त्याचा नंबर मागितला होता. मला त्याच्याशी बोलायचं होतं. कारण त्या काळात मी त्याच्याबद्दल बरचं काही ऐकत होतो. पण मला नंबरच मिळाला नाही. त्याने नंबर बदलला होता. त्या जवळच्या व्यक्तिने मला सांगितलं की, सुशांतने स्वत:ला कोंडून घेतलं आहे. तो फोन उचलत नाहीये. त्या व्यक्तिने नाही म्हटलं आणि म्हणून मी नंबर मिळवण्याचं थांबवलं. पुढे मी माझ्या कामात बिझी झालो. पण मी सुशांतला भेटायला हवं होतं..., असं अमित म्हणाला.
मी इंडस्ट्री सोडायचा विचार केला होता...सुशांतच्या निधनाची बातमी माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला होता की, मी इंडस्ट्री सोडायचा विचार केला होता. त्यावेळी माझा ब्रीद ही सीरिज प्रदर्शित होणार होती. पण मला प्रमोशन करायचीही इच्छा होत नव्हती. मला कंटाळा आला होता. मी संतापलो होतो कारण या इंडस्ट्रीत टिकणं खूप कठीण आहे, असं अमित म्हणाला.
मी चारवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता...16 ते 18 या वयात मी स्वत: चारदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला आत्महत्या करणाऱ्याची मानसिकता माहित आहे. आता मी खूप स्टाँग आहे. पण मला ठाऊक आहे की, एखादी व्यक्ती आत्महत्या करते ती तिची चूक नसते, ती समाजाची चूक असते. त्याच्या सभोवती असणाऱ्या लोकांची चूक असते. मी यातून गेलोय, असा खुलासाही अमितने यावेळी केला.