अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचा ‘आनंद’ हा क्लासिक सिनेमा प्रदर्शित होऊन 48 वर्षे झालीत. चित्रपटाची पटकथा असो वा कलाकारांचा अभिनय. या चित्रपटाने प्रत्येकबाबतीत इतिहास रचना. ऋषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन एका रात्रीत सुपरस्टार बनले. होय, हा इंटरेस्टिंग किस्सा स्वत: अमिताभ यांनी सांगितला आहे.‘आनंद’ हा अमिताभ यांच्या सुरुवातीच्या काळातील सिनेमा होता. साहजिकच अमिताभ यांना फार कुणीही ओळखत नव्हते.
होय, ‘आनंद’ रिलीज झाला त्याच दिवशीची ही गोष्ट. ज्यादिवशी हा सिनेमा रिलीज झाला, त्यादिवशी सकाळी अमिताभ आपल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी एका पेट्रोलपंपवर गेले होते. त्यावेळी कुणीही त्यांना ओळखले नाही. कारमध्ये पेट्रोल भरायला आलेला हा बॉलिवूड स्टार आहे, हे लोकांच्या गावीही नव्हते. संध्याकाळी अमिताभ त्याच पेट्रोलपंपवर पुन्हा गेले आणि काय आश्चर्य एवढा मोठा स्टार आपल्या पेट्रोलपंपवर पेट्रोल भरायला आलेला पाहून लोकांनी एकच गर्दी केली. ‘आनंद’ने ही कमाल केली होती. ‘आनंद’ रिलीज होताच अमिताभ बच्चन स्टार झाले होते.
‘आनंद’ हा ख-या अर्थाने अमिताभ यांचा पहिला हिट सिनेमा होता. यानंतर अमिताभ यांनी अनेक सुपरहिट सिनेम दिले. पुढे तर त्यांनी इतिहास रचला. महानायक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ‘आनंद’ या सिनेमात राजेश खन्ना यांनी एका कॅन्सर रूग्णाची भूमिका साकारली होती. चित्रपटाची गाणीही तुफान लोकप्रिय झाली होती.
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ते ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुलाबो’ या सिनेमात बिझी आहेत. वाढते वय, प्रकृतीच्या तक्रारी याऊपरही अमिताभ आजही काम करत आहेत.