Join us

आसामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमारनंतर पुढे सरसावले अमिताभ बच्चन, ५१ लाखांची केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 6:55 PM

अक्षय कुमारनंतर आता अमिताभ बच्चन आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रूपयांची मदत केली आहे.

आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आसाम मुख्यमंत्री सहायता निधी आणि काझीरंगा नॅशनल पार्कसाठी १-१ कोटी रुपये दिले आहेत. त्यानंतर बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी ५१ लाखांचा मदतनिधी दिला आणि इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

अमिताभ बच्चन यांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदत केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ लाखांचे योगदान दिल्याबद्दल आम्ही अमिताभ बच्चन यांचे आभार मानतो. ही लोकांची देखभाल करण्याची एक चांगली पद्धत आहे. तुमच्या समर्थनासाठी आसामच्या जनतेकडून आभार.

 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटचे उत्तर देताना लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, आसाम संकटात आहे, पुरामुळे खूप नुकसान झाले आहे. आपल्या भावा बहिणीच्या सुरक्षेसाठी तसेच मदतीसाठी त्यांना सहकार्य करा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करा. मी आताच केली आहे. तुम्ही केलीत का?

मुसळधार पावसामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. २९ जिल्ह्यांतील ५७, ५१, ९३८ लोकांना पुराचा फटका बसला आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर गुलाबो सिताबो या सिनेमात दिसणार आहे. यात पहिल्यांदा आयुषमान खुराना बिग बींसोबत काम करणार आहे. तसेच नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटातही ते दिसणार आहे. हे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय ते ब्रह्मास्त्र चित्रपटातही झळकणार आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनआसामआसाम पूरसर्वानंद सोनोवाल