मराठी रंगभूमी, मराठी सिनेमा, छोटा पडदा गाजवल्यानंतर तिनं बॉलीवूडमध्येही यशस्वी एंट्री केलीय. ही अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष. तिच्या पहिल्यावहिल्या सिनेमाच्या अभिनयावर आता बॉलीवूडही फिदा झालंय. त्यामुळं तिला बॉलीवूडच्या सिनेमांची लॉटरीच लागलीय...नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा आणि सत्यदेव दुबेंची विद्यार्थिनी असलेल्या अमृतानं आजवर अनेक भूमिका गाजवल्या. ती फुलराणी असो किंवा देवराई, गंध, श्वास, वळू, विहीर, किल्ला यासारख्या मराठी सिनेमांतील भूमिका. अमृतानं दरवेळी रसिकांची वाहवा मिळवली. त्यामुळंच अमृताच्या 'रमन राघव 2.0' या बॉलीवूडच्या सिनेमाकडं रसिकांच्या नजरा लागल्या होत्या. या सिनेमात अमृताची छोटीशी भूमिका असली तरी त्याला तिनं पूर्ण न्याय दिलाय. याच छोट्या मात्र तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेमुळं अमृताची बॉलीवूडमध्येही जोरदार चर्चा सुरू झालीय. 'रमन राघव 2.0' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बहिणीची भूमिका तिनं साकारली आहे. याच कसदार आणि दमदार भूमिकेमुळं अमृतानं अवघ्या बॉलीवूडचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आगामी काही दिवसांत अमृताचे तीन हिंदी चित्रपट रसिकांच्या भेटीला येताहेत. आगामी काळात बड्या बड्या दिग्दर्शकांसोबत अमृता काम करणार आहे. तिच्या आगामी सिनेमांमध्ये 'आयर्लंड सिटी', 'चिड़ीयाँ' आणि 'अल्बर्ट आइनस्टाइन बनना चाहता हुँ' या सिनेमांचा समावेश आहे. आता रमन राघव 2.0 या सिनेमानंतर अमृताच्या आगामी बॉलीवूड सिनेमांची रसिकांना उत्सुकता नक्कीच लागली असणार. अमृतानं आजवर ज्या रीतीनं नाटक, मराठी सिनेमा, छोटा पडदा गाजवला त्याचप्रमाणे आगामी काळात हिंदी सिनेमांमध्ये आपल्या यशाचा झेंडा रोवत बॉलीवूडमध्ये अढळ स्थान निर्माण करावं हीच तिच्या फॅन्सची इच्छा आहे.
अमृताला लागली बॉलीवूडची लॉटरी!
By admin | Published: June 30, 2016 1:01 AM