बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या अनुभवासह वैयक्तिक आयुष्यातील काही खास क्षण किंवा प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवत असतात. नुकतंच त्यांनी आपला एक फोटो शेअर करत दिवसभरातील शेड्युलची माहिती दिली होती. शूटिंगबाबतची माहिती देण्यासोबतच मुंबईतील त्यांच्या 'जलसा' बंगल्यावर निर्माण झालेल्या एका वेगळ्याच समस्येचीही माहिती त्यांनी दिली आहे. 'जलसा' बंगल्यावर वटवाघळ्यांच्या उपद्रवानं बच्चन कुटुंबीय त्रासले आहेत आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून 'जलसा'वर निर्माण झालेल्या वटवाघळांच्या संकटाचा उल्लेख केला आहे. "वटवाघळं! खूप काळजी बाळगल्यानंतरही पुन्हा त्यांचा त्रास सुरू झाला आहे. काल रात्रीही त्यांचा सामना करावा लागला. त्यांना दूर करण्यासाठीची सर्व सामग्री एकत्र करण्यात आली. जेणेकरुन त्यांच्यापासून मुक्तता मिळेल आणि कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली भीती संपुष्टात येईल", असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अमिताभ यांनी वटवाघळांपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय सुचवण्याचं फॅन्सना आवाहन केलं आहे. "मला EF Brigade कडून मला कोणताही सल्ला नकोय. तुमच्याकडे काही नवा उपाय असेल तर मला नक्की सुचवा. आम्ही धूर केला, सॅनिटाइज लिक्विड, इलेक्ट्रॉनिक रिपेलेंट गॅजेट आणि eucalyptus तेलही शिंपडलं पण कशाचाच काही उपयोग झाला नाही", असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.