Join us

KBC 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात पाणी, म्हणाले, 'देवियो और सज्जनो...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 14:08 IST

18 एप्रिल 2023 रोजी 'कौन बनेगा करोडपती' च्या १५ व्या सिझनला सुरुवात झाली होती.

बॉलिवूडचे शहेनशाह अनेक वर्षांपासून टीव्हीवरील लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) शो होस्ट करत आहेत. या शोने बिग बींना खूप प्रसिद्धी आणि प्रेम दिलं आहे. नुकताच KBC 15 चा शेवटचा एपिसोड २९ डिसेंबर रोजी टेलिकास्ट झाला. या सिझनचा हा शेवटचा एपिसोड असल्याने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. या एपिसोडमध्ये विद्या बालन, शर्मिला टागोर आणि सारा अली खान यांनी हजेरी लावली. पण जेव्हा शो संपायची वेळ आली तेव्हा बच्चन यांच्या डोळ्यात पाणी आले.

18 एप्रिल 2023 रोजी 'कौन बनेगा करोडपती' च्या १५ व्या सिझनला सुरुवात झाली होती. अनेक सामान्य लोक या शोमध्ये येऊन लखपती तर कोणी करोडपतीही झाले. सर्व स्पर्धकांसोबत अमिताभ बच्चन यांनी गप्पागोष्टी, मजामस्ती केली. बिग बींनी स्वत:चेही अनेक मनोरंजक किस्से सांगितले. जेव्हा एपिसोड सिझनच्या शेवटाकडे गेला तेव्हा ते भावूक झाले. ते म्हणाले,'देवियो और सज्जनो, आता मी जातोय आणि उद्यापासून हा मंच नसेल. हे आपल्या प्रिय माणसांना सांगणं खूप अवघड असतं आणि ही सांगायची आपली इच्छाही नसते. मी अमिताभ बच्चन या सिझनमध्ये या मंचावरुन शेवटचं बोलतोय शुभ रात्री!' असं बोलून ते हात जोडतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. समोर बसलेले प्रेक्षकही भावूक होतात. केबीसीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडिओत एक फ्लॅशबॅकही चालवला जातो ज्यामध्ये एक महिला अमिताभ बच्चन यांना म्हणते,'आमच्यातील कोणीच देवाला बघितलेलं नाही पण देवाच्या सर्वात लाडक्या व्यक्तीला आम्ही बघत आहोत.' हे प्रेक्षकांचं, चाहत्यांचं बच्चन यांच्यावरील प्रेमच आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयातून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून सर्वांनाच आपलंसं केलं आहे आणि अजूनही करत आहेत.  

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजन