कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प पडले आहे. लोक घरात कैद आहेत. अशात देशातील प्रत्येकजण आपआपल्या परीने कोरोनाशी लढतोय. देशातील सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करताहेत. आता सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकाांनी एकत्र येऊन एक शॉर्टफिल्म बनवली आहे. ‘फॅमिली’ असे या शॉर्टफिल्मचे नाव.
या शॉर्टफिल्मचे वैशिष्ट्य म्हणजे, घरातून बाहेर न पडता आपआपल्या घरात राहून या शॉर्टफिल्मचे शूटींग करण्यात आलेय. अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, मामुटी, रणबीर कपूर, प्रियंका चोप्रा, आलिया भट, दिलजीत दोसांज, सोनाली कुलकर्णी असे दिग्गज कलाकार यात आहेत. यापैकीही सर्वांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून आपआपल्या घरात राहून ही शॉर्टफिल्म साकारली आहे. अर्थात ती पाहतांना हे लोक एकत्र नाहीत, असे क्षणभरही जाणवणार नाही.प्रसून पांडे यांच्या कल्पनेतून साकारली ही शॉर्टफिल्म पाहणे एक वेगळा अनुभव आहे. लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे शिवाय त्यांचे मनोरंजन करणे, हा या शॉर्टफिल्मचा एकमेव उद्देश आहे. शिवाय यातून होणा-या कमाईतून 1 लाख गरजूंना महिनाभराचे राशन पुरवण्यात येणार आहे.अमिताभ यांनी ही शॉर्टफिल्म शेअर केली आहे. ‘ये एक अद्भूत, अकल्पनीय आणि असाधारण प्रयत्न. जो ना पहले कभी देखा गया है और ना कभी हुआ है. एक संकल्प है आपके लिए, हम सब के लिए, ’असे अमिताभ व्हिडीओ म्हणतात.तूर्तास या शॉर्टफिल्मवर लोकांच्या उड्या पडताहेत. काही तासांत लाखो लोकांनी ही शॉर्टफिल्म पाहिली आहे. तुम्हीही पाहा आणि तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते जरूर कळवा...