Join us  

अमिताभ बच्चन होणार अयोध्येचे रहिवासी, राम मंदिर सोहळ्यापूर्वी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:42 AM

राम मंदिर सोहळ्यापूर्वी बिग बींची मोठी खरेदी

Ayodhya Ram Mandir: अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशवासीय आतुर आहेत. २२ जानेवारी रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह साधुसंत महंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. या सोहळ्यापूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. तसंच  या ठिकाणी बिग बी घर बांधणार आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन अयोध्येचे रहिवासी होणार आहेत का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

हिंदुस्तान टाईम्स रिपोर्टनुसार, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. मुंबईच्या द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या 7 स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये त्यांनी एक प्लॉट खरेदी केला आहे. याठिकाणी बिग बी 10 हजार स्क्वेअर फूट मोठं घर बनवणार आहेत. या प्लॉटची किंमत तब्बल 14.5 कोटी रुपये आहे. अयोध्येत गुंतवणूक केल्यानंतर अमिताभ बच्चन भावना व्यक्त करताना म्हणाले,'अयोध्या या शहरासाठी माझ्या मनात विशेष स्थान आहे.'

एचओएबीएलचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले,"सरयूचे प्रथम नागरिक म्हणून मी अमिताभ बच्चन यांचं स्वागत करतो. हा प्रोजेक्ट राम मंदिरपासून जवळपास 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्ध्या तासावर आहे. याच ठिकाणी ब्रुकफील्ड ग्रुपचं लीला पॅलेस, हॉटेल आणि रिसॉर्ट्स पार्टनरशिपमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलही आहे. हा प्रोजेक्ट 2028 पर्यंत पूर्ण होण्याची योजना आहे.

2019 नंतर अयोध्येत मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्या आणि आजूबाजूला जमीनींच्या किंमतीत मोठी वाढ झाली. टाटा ग्रुपसोबत अनेक लोक याठिकाणी गुंतवणूक करत आहेत.  

टॅग्स :अमिताभ बच्चनअयोध्याराम मंदिर