महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ६० ते ७० च्या दशकापासून ते आताची पिढीही त्यांची चाहती आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांच्या कामाची गती तरुणांनाही लाजवणारी आहे. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती' चे सूत्रसंचालन करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये त्यांनी ऑटोग्राफचा एक किस्सा सांगितला.
हॉटसीटवरील स्पर्धकाशी गप्पा मारताना पेन चा विषय निघाला. पेनाबद्दलच्या आठवणी सांगत बि बी म्हणाले, 'शाळेत तिसरीपर्यंत पेन्सिलच होती. चौथीपासून पेनाने लिहायची परवानगी होती. त्यामुळे चौथीत गेल्यावर पहिला पेन मिळाला. लहानपणी आवडती गोष्ट उशीजवळ ठेवून झोपायची सवय असते. मी सुद्धा पेन उशीखाली ठेवून झोपायचो.'
ते पुढे हसतच म्हणाले,'अभिनयाला सुरुवात केल्यानंतर मी पेनाने ऑटोग्राफ द्यायचा सराव करायचो. अभिनेता झाल्यावरही मी ती प्रॅक्टिस करत राहायचो. आपला ऑटोग्राफ कसा असेल याचा तो सराव असायचा. म्हणजे कोणी ऑटोग्राफ घ्यायला आलं तर मला माझी सही माहित पाहिजे. म्हणून सर्वात आधी मी माझा ऑटोग्राफ बनवायचो.'