कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. देशातही कोरोना व्हायरसचा प्रादर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सध्या देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांसोबत सोलिब्रेटीदेखील आपल्या घरात आहेत. तसेच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना व लोकांना घरात थांबण्याचे आवाहन करत आहेत. याशिवाय काही सेलिब्रेटी जनजागृती आणि धैर्य वाढविण्यासाठी गाणी व कविता सादर करत आहेत. त्यात आता कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती पसरवण्यासाठी नुकताच एक लघुपट सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात लोकांनी घरातच रहावे हा संदेश अनोख्या पद्धतीने देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या लघुपटात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही दिसत आहे. ती रणबीरला अमिताभ बच्चन यांचा हरवलेला चष्मा शोधायला सांगते आहे. या लघुपटातील सोनालीच्या कामाची पोचपावती चक्क बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पत्रांच्या माध्यमातून दिले आहे.
‘अजून काय हवंय आयुष्यात.. महानायकाच्या हस्ताक्षरातील पत्र..’, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेली ही शॉर्टफिल्म सध्या चर्चेचा विषय ठरत असून विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतेही कलाकार घरातून बाहेर पडले नाहीत. या लघुपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, गायक- अभिनेता दिलजीत दोसांज, तमिळ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत, मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल आणि ममूटी, तेलगू सिनेमाचे स्टार चिरंजीवी, कन्नड सिनेमातील अभिनेते शिवा राजकुमार, बंगाली सिनेमातील नावाजलेला चेहरा प्रोसेनजीत चटर्जी यांचा सहभाग आहे.