मुंबई: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी नियमितपणे संवाद साधत असतात. ते अनेक विषयांवर आपली मते या माध्यमातून मांडतात. नेहमीप्रमाणे रविवारी देखील अमिताभ यांनी असेच एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी आपण नुकताच हॉलीवूडचा 'अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर' हा चित्रपट बघितल्याचे सांगितले. मात्र, हा चित्रपट आपल्याला बिलकूल समजला नाही. संपूर्ण चित्रपटभर काय सुरू आहे, हेच मला कळत नव्हते, असे अमिताभ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र, भारतातील प्रेक्षकांनी ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ ला चांगलेच डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे काही चाहत्यांनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे.
‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. फक्त १३ दिवसांत चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार करत भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी ३१.३३ कोटींची कमाई करत चित्रपटाने ‘बागी २’ आणि ‘पद्मावत’चा रेकॉर्ड मोडला होता. फक्त चार दिवसातच चित्रपटाने १०० कोटींची कमाई करत आधीच रेकॉर्ड केला होता. ‘इन्फिनिटी वॉर’ हा एमसीव्हीचा फेस १ मधील शेवटचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या पटकथेची सुरूवात २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आर्यनमॅन सिनेमापासून झाली. या चित्रपटानंतर ‘आर्यनमॅन’, ‘अॅवेंजर्स’, ‘थॉर’ असे एकाहून एक सरस तब्बल १५ सिनेमांमधून ‘इनफिनिटी वॉर’ची पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती.