मुंबई - संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सरकारने अचानक बोलावलेल्या विशेष अधिवेशनात नेमके काय होणार याची कुणालाही कल्पना नाही. त्यात आधी एक देश, एक निवडणूक, त्यानंतर महिला आरक्षण आणि आता विरोधी पक्षाकडून वेगळाच दावा करण्यात येत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट करून हा दावा केला आहे. तर, जी२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या स्नेहभोजनातील पत्रिकेवरुन वाद रंगला आहे.
राष्ट्रपतींनी जी-२० संमेलनातील डिनरसाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुखांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबरवर जी-२० संमेलनाच्या डिनरसाठी निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. त्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. त्यावरुन, विरोधक आक्रमक झाले असून मोदी सरकारमधील नेते व मंत्री याचे समर्थन करत आहेत. जर संविधानाचे कलम १ वाचले तर त्यात भारत जो इंडिया आहे, एका राज्यांचा संघ असेल. आता, या संघराज्याला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी केलाय. तर, काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही यावरुन मोदी सरकारला सुनावलं आहे.
राष्ट्रपती भवनमधील पत्रिका एकीकडे चर्चेत असताना, या पत्रिकेवरुन वाद सुरू असताना बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. अमिताभ यांनी भारत माता की जय... असं ट्विट केलंय. त्यामुळे, अमिताभ यांना नेमकं काय म्हणायचंय हे सध्यातरी स्पष्ट होत नाही. मात्र, त्यांनी केलेलं ट्विटचं टायमिंग आणि राष्ट्रपती भवनाच्या निमंत्रण पत्रिकेतील वाद एकच आल्याने त्यांचं ट्विट व्हायरल झालं आहे. तसेच, या ट्विटरवर चाहते कमेंट करुन प्रतिक्रिया देत आहेत.
लवकरच संसदेचं विशेष अधिवेशन
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्या अमृत कालाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा केली आहे. परंतु कुठलाही निश्चित अजेंडा समोर आला नाही. त्यामुळे विविध चर्चा सुरू आहेत. विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणूक, महिला आरक्षण विधेयक आणि इंडियाऐवजी भारत यासारख्या विधेयक अथवा प्रस्ताव आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंडिया नाव बदलणार?
जर इंडिया आणि भारत नावाची चर्चा सुरू आहे तर संविधानात ज्या ज्या ठिकाणी इंडिया शब्दाचा वापर आहे तिथे भारत केले जाणार आहे, याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, आपल्या देशाचे खूप वर्षाआधी भारत असं नाव होते. त्यामुळे याला इंडिया असं बोलायला नको. त्याशिवाय राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी इंडिया हा शब्द गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे संविधानात भारत शब्दाचा उल्लेख करायला हवा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा काही खासदारांनी उपस्थित केला होता. त्यामुळे विशेष अधिवेशनात याबाबत काही प्रस्ताव अथवा विधेयक आणलं जातंय का हे पाहणे गरजेचे आहे.