Join us

'कलाकार स्वत:च्या फायद्यासाठी राजकारणी झाले'; अमजद खान यांनी उघड केलं अभिनेत्यांचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:01 AM

Amjad-khan: 'काही कलाकर हे सोयीसाठी राजकारणात प्रवेश करतात', असं थेट विधान त्यांनी केलं होतं.

भारदस्त आवाज आणि चेहऱ्यावर करारी भाव असलेला अभिनेता म्हणजे अमजद खान. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली. अमजद खान यांच्या नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिका जास्त गाजल्या. यात खासकरुन शोले सिनेमातील गब्बर ही भूमिका तर त्यांनी अजरामर केली. आजही अमजद खान, गब्बर या भूमिकेसाठी विशेष ओळखले जातात. या अभिनेत्याच्या अभिनयाला जितकी धार होती तितकीच त्यांच्या स्वभावातही होती त्यामुळे बऱ्याचदा ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. सध्या सोशल मीडियावर त्यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यात त्यांनी राजकारणात प्रवेश करणाऱ्या कलाकारांविषयी भाष्य केलं आहे.

काही कलाकर हे सोयीसाठी राजकारणात प्रवेश करतात, असं थेट विधान त्यांनी केलं होतं. सोबतच मी कधीही राजकारणात जाणार नाही, असंही सांगितलं होतं. त्यांची ही मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमजद खान यांनी वयाच्या ११ व्या वर्षापासून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.  त्यानंतर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, शोलेच्या गब्बर सिंगने त्यांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली. हा सिनेमा १९७५ मध्ये रिलीज झाला होता. त्या काळात अनेक कलाकार सिनेसृष्टीसह राजकारणातही प्रवेश करत होते. त्यामुळेच एका मुलाखतीमध्ये अमजद खान यांना राजकारणात प्रवेश करण्याविषय़ी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, कलाकार सोयीसाठी राजकारणात जातात असं म्हटलं होतं.

'सिनेविश्वातील अनेक कलाकार, राजकारणात प्रवेश करत आहेत. तुमचाही असा काही विचार आहे का?' असा प्रश्न अमजद खान यांना विचारण्यात आला. त्यावर, "नाही. सिनेसृष्टीतून जेवढे राजकारणी झाले त्यापैकी दत्तसाहेब सोडले तर बाकी सगळे स्वत:च्या फायद्यासाठी आणि सोयीसाठी झाले आहेत. काही तरी फायदा होईल याच कारणासाठी प्रत्येक व्यक्ती राजकारणी झाली आहे. आणि होत आहेत", असं अमजद खान म्हणाले.

पुढे ते म्हणतात, ''मी कधीच नेता होऊ शकत नाही कारण, मी खोटं बोलू शकत नाही. राजकारणी होण्यासाठी खोटं बोलणं फार महत्त्वाचं आहे. आणि, मी सतत खोटं बोलू शकत नाही.''

टॅग्स :अमजद खानबॉलिवूडराजकारणसेलिब्रिटी