Join us

डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अमृता खानविलकर सांगतेय 'वेल डन बेबी'च्या अनुभवाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:33 IST

अभिनेत्री अमृता खानविलकरचे काही दिवसांपूर्वी डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरचे काही दिवसांपूर्वी डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होते. तिचे हे फोटो तिचा आगामी चित्रपट वेल डन बेबीमधील आहे. तिचा हा चित्रपट लवकरच अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते यांच्यासोबत एका हलक्या फुलक्या कौटुंबिक नाट्य असलेल्या या चित्रपटात अमृताने मीराची भूमिका साकारली आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या अनुभवाविषयी बोलताना अमृता म्हणाली, “वेल डन बेबी ही एक अतिशय खास कथा आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या अशा भिंगातून ती नातेसंबंधांवर भाष्य करते. या चित्रपटामुळे मला हे समजायला मदत झाली की आपण घेतलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयाचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो आणि त्याच वेळी आपले संबंध कसे विकसित होत जातात, हे देखील मला समजले.

चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा जवळपास माझ्यासारखीच आहे. मी तिच्याशी खूप चांगल्या तऱ्हेने समरूप होऊ शकते, तिला समजून घेऊ शकते आणि त्यामुळे चित्रपटातील मीरा मी अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकले.”

प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील अशा जोडप्याभोवती फिरते, जे त्यांच्या वैवाहिक समस्यांसोबत झगडत असताना त्यांना लक्षात येते की त्यांना मूल होणार आहे. या चित्रपटाचा खास प्रीमिअर भारतात अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ९ एप्रिल रोजी होणार आहे.

टॅग्स :अमृता खानविलकरपुष्कर जोग