राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केला. गुरुवारी(५ डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसदेखील उपस्थित होत्या. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
अमृता यांनी शपथविधी सोहळ्यातील देवेंद्र फडणवीसांचा शपथ घेतानाचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्यांनी खास पोस्टही लिहिली आहे. "पलट के आई हूँ शाखों पे खुशबुएँ लेकर, ख़िज़ाँ की ज़द का अब ग़म नहीं, मौसमे-बहार मरहमे ख़ुशी लाई है!", असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. पुढे त्या म्हणतात, "तुमच्या भाऊ आणि वहिनीला प्रेम दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची आभारी आहे. माझ्या कार्यक्षमतेचा वापर करून सेवा आणि बदल घडवून आणण्यासाठी मी तुमची वहिनी म्हणून काम करेन".
कोण आहेत अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. त्या पेशाने बँकर असून त्यांना गायनाचीही आवड आहे. त्यांनी आजवर अनेक गाण्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अमृता फडणवीस यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असतो. अनेक कार्यक्रमांना त्या हजेरी लावताना दिसतात. तसंच त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहादेखील या सोहळ्याला उपस्थित होते.