वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिचा आज म्हणजेच २३ नोव्हेंबरला वाढदिवस असून तिचा जन्म पुण्यातला आहे. आज मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने मेहनतीच्या जोरावर तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. 'गोलमाल', 'साडेमाडे तीन', 'नटरंग', कट्यार काळजात घुसली 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा मराठी सिनेमात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या डान्सने साऱ्यांनाच वेड लावलं. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आलिया भट्टच्या राझी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते.
अमृता खानविलकर तिचा प्रियकर हिमांशू मल्होत्रासोबत २४ जानेवारी २०१५ ला विवाहबंधनात अडकली. अमृता ही मराठी आणि हिमांशू हा पंजाबी असल्यामुळे 'पंजाबी-मराठी' अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी अमृता लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. अमृता आणि हिमांशुची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. जवळपास 10 वर्षं दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचीही चांगलीच केमिस्ट्री जमली होती. दहा वर्षं डेट केल्यानंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
अमृताचा पती हिमांशु मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो तर अमृता मराठी, हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीत खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. अमृता आणि हिमांशु यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.