मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (amruta khanvilkar). उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिचं नशीब आजमावलं आहे. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. इतकंच नाही तर 'लुटेरे' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने आता ओटीटीवरही पदार्पण केलं आहे. सध्या अमृताची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने या सीरिजच्या शुटिंगचा एक भयानक किस्सा शेअर केला.
अमृताने अलिकडेच मिड -डे ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने लुटेरेचं दक्षिण आफ्रिकेत झालेल्या शुटिंगचा थरारक किस्सा सांगितला. एका स्लम एरियात या वेबसीरिजचं शुटिंग झालं होतं. हा एरिया इतका भयानक होता की कधीही कोणत्याही व्यक्तीसोबत काहीही घडू शकत होतं.
"आम्ही दक्षिण आफ्रिकेत शूट करत होतो. आपल्याकडे धारावीचा स्लम एरिया हा आशियातील सर्वात मोठा एरिया आहे आहे. तसाच तो आफ्रिकेतील सर्वात मोठा स्लम एरिया होता. थोडक्यात पृथ्वीवरची सर्वात मोठी झोपडपट्टी. आम्ही कोरोना काळात त्या भागात शुटिंग करत होतो. तेव्हा आफ्रिकेत आर्थिक चणचण होती. त्यामुळे तिथे साधेह लोकही बंदुका घेऊन फिरायचे", असं अमृता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "शुटिंगच्या पहिल्या दिवशी मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसले होते. त्यावेळी खूप गरम होत होतं. त्यामुळे मी व्हॅनिटीचा दरवाजा उघडा ठेऊन बसले होते. तितक्यात सेटवरुन एक मुलगा पळत आला आणि मला म्हणाला, दरवाजा बंद करुन बसा नाही तर इथून तुम्हाला कोणाही किडनॅप करुन घेऊन जाईल. मग आम्हीही काहीच करु शकणार नाही. त्यावेळी सेटवर अत्यंत भीतीचं वातावरण होतं. त्या भागात माफिया , बेरोजगार आणि गुन्हेगारी खुप वाढली होती. अशा ठिकाणी शुटिंग करणं फार असुरक्षित होतं. त्यापेक्षा आपण भारतात खूप सुखी आहोत. आपल्याला जे पाहिजे ते आपण बोलू शकतो, हवं तिथे फिरू शकतो. तिथे असं काहीच नव्हतं”.
दरम्यान, अमृताने या मुलाखतीमध्ये शुटिंग करतांना आलेल्या अन्य अडचणींवरही भाष्य केलं. अमृताची ही सीरिज अलिकडेच २२ मार्च रोजी ओटीटीवर रिलीज झाली आहे.