कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू, राजकारणातील दिग्गजांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत पुनीतच्या निधनाची बातमी देत असताना, कन्नड न्यूज चॅनेल BTVच्या अँकरला रडू कोसळले. त्यानंतर तिचे सहकारी तिचे सांत्वन करत असताना पहायला मिळत आहे.
पुनीत 'अप्पू' या नावाने ओळखले जात होतेपुनीत राजकुमार हे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत लोकप्रिय नाव आहे. कन्नड चित्रपटांमध्ये त्यांचा दबदबा असून त्यांनी २९ पेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहे. पुनीत यांनी बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. बेट्टाडा हूवू असे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. हा चित्रपट १९८५ मध्ये रिलीज झाला होता. इतकेच नाही तर त्यांना कर्नाटक राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुनीत यांना अप्पू या नावाने ओळखले जाते. २००२ मध्ये त्यांना ही ओळख मिळाली. ‘अभी’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि ‘अनजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. शेवटचे ते युवारथ्ना या चित्रपटात झळकले आहेत.