आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्यातील गुजगोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांना असते. खास करून त्यांची आवडती डिश, फेव्हरेट कलर, तसेच त्यांची प्रेमप्रकरणं अशा अनेक गोष्टींचा मागोवा ही चाहते मंडळी घेत असतात. अशा या चाहत्यांसाठी एक गमतीदार बातमी आहे. श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘बसस्टॉप’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक भन्नाट किस्सा आहे. तो म्हणजे पूजा सावंतला पाण्याची फार भीती वाटते, त्यातही स्विमिंग पूल म्हटलं तर नको रे देवा, अशी पूजाची अवस्था होते. मात्र, सिनेमाच्या एका सीनसाठी पूजाला पाण्यात उडी मारावी लागणार होती. अनिकेत विश्वासरावला पाण्यात धक्का मारून स्वत: पाण्यात उडी तिला मारायची होती, त्यानुसार सगळे ठरले देखील. दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटले आणि पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले; मात्र स्वत: पाण्यात उडी मारायचे सोडून तिने चक्क पळच काढला. पूजाच्या या कृतीमुळे टीममध्ये सर्वत्र हशा पिकला; मात्र रिटेकमध्ये पूजाने हिंमत करून सीन पूर्ण केला. अशी ही चित्रीकरणादरम्यान झालेली छोटीशी गंमत जरी असली, तरी याहून अधिक भन्नाट गोष्टी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. यात पूजा आणि अनिकेतबरोबरच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे या कलाकारांची धम्माल देखील पाहायला मिळणार आहे. पडद्यावरच्या या सर्व कलाकारांच्या गमतीजमती २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहेत.
..आणि अनिकेतला पाण्यात ढकलून पूजाने काढला पळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:10 AM