...आणि मला एकटे असल्याची जाणीव झाली, सायली संजीवने सांगितली ती आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 10:53 AM2022-04-10T10:53:26+5:302022-04-10T11:21:25+5:30

Sayali Sanjeev: नाशिकसारख्या प्रगत पण निवांत शहरातून मी २०१६ मध्ये मुंबईत दाखल झाले. त्यापूर्वी एका महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अभिनयाची पारितोषिके मिळवली होती. तिथे परीक्षक म्हणून आलेल्या प्रवीण तरडे यांनी मला मुंबईत येऊन नशीब अजमावण्यासाठी प्रोत्साहन दिले.  

... and I realized I was alone, that recollection of Sayali Sanjeev | ...आणि मला एकटे असल्याची जाणीव झाली, सायली संजीवने सांगितली ती आठवण

...आणि मला एकटे असल्याची जाणीव झाली, सायली संजीवने सांगितली ती आठवण

googlenewsNext

- सायली संजीव
(अभिनेत्री)

नाशिकसारख्या प्रगत पण निवांत शहरातून मी २०१६ मध्ये मुंबईत दाखल झाले. त्यापूर्वी एका महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अभिनयाची पारितोषिके मिळवली होती. तिथे परीक्षक म्हणून आलेल्या प्रवीण तरडे यांनी मला मुंबईत येऊन नशीब अजमावण्यासाठी प्रोत्साहन दिले.  काही ठिकाणी माझे नाव सुचवले देखील. अपेक्षेप्रमाणे कामे मिळत नाहीयेत असे लक्षात आल्यावर मी नाशिकला परत येऊन राज्यशास्त्रातून बी.ए. पूर्ण केले. त्याच सुमारास मला ‘काहे दिया परदेस’ ही मालिका मिळाली आणि मी मुंबईकर झाले.

माझ्या वडिलांचा माझ्यावर प्रचंड जीव होता. मी जरी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले असले तरी नाशिकमध्ये माझे वडील प्रत्येक ठिकाणी मला सोडायला आणि न्यायला स्वतः यायचे. त्यांनी मला तसे फारसे कष्ट कधी पडू दिले नव्हते आणि अशा या सुरक्षित कौटुंबिक वातावरणातून एकदम अवाढव्य मुंबईनगरीत मी एकटी माझे नशीब घडवण्यासाठी आले होते.  एक मात्र मी नक्की ठरवले होते, चार पैसे जास्त कमवण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागली तरी चालेल; पण मी रिक्षा किंवा टॅक्सीशिवाय फिरणार नाही. मी मुंबईत आल्या आल्या पल्लवी या माझ्या मैत्रिणीकडे पार्ल्याला २-३ महिने राहिले. मग दिंडोशीला फिल्मसिटी जवळ राहायला गेले.

एकदा पावसाळ्यात एका कार्यक्रमानंतर आरे मार्गे गोरेगावला परतताना एक भीतीदायक अनुभव आला. वाटेत झाड पडल्यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती आणि त्या अनोळखी भागात अचानक आपण एकटे असल्याची जाणीव झाली. सरळ चालत हायवेपर्यंत आले; पण तिथेही काही वाहन मिळेना. शेवटी एका भल्या गृहस्थाने घरापर्यंत सोडले. वाटेत कळले की त्यांना माझे मालिकेतले काम खूप आवडत होते. आजही तो प्रसंग मनावर कोरल्यामुळे  आरे मार्गे कुठेही जायची माझी हिम्मत होत नाही.

इथे मला जसे मनोरंजन क्षेत्रात काम करते म्हणून घर भाड्याने द्यायला नकार देणारे भेटले, तसेच रोज काहीतरी नवीन पदार्थ खाऊ घालणारे प्रेमळ शेजारीही मिळाले. इथे तुम्हाला चांगली वाईट सर्व प्रकारची माणसे भेटतात, ज्यांच्यामुळे इथे सतत काहीतरी घडत असते.   हे शहर माझ्यासारख्या अनेकांची लाईफलाईन आहे. माझ्यासाठी तर हे शहरच ‘गार्डियन’ आहे. याने मला सांभाळलंय, उभे केले आहे आणि पुढेही नेले आहे!
- शब्दांकन :  तुषार श्रोत्री

Web Title: ... and I realized I was alone, that recollection of Sayali Sanjeev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.