मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या गोड आवाजातून शहीद जवानांसाठी विशेष गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे. संगीतकार मयुरेश पै यांनी जुळवून आणलेल्या या प्रोजेक्टमध्ये लता मंगेशकर यांनी ‘सौगंध मुझे इस मिठ्ठी की’ हे गाणे गायले आहे.
पाकिस्तानच्या बालाकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये पार पडलेल्या एका जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी ही कविता वाचली होती. शनिवारी या गाण्याविषयी टष्ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांनी ही माहिती दिली. या टष्ट्वीटमध्ये लता मंगेशकर यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात कवितेचा उल्लेख ऐकला होता. त्यावेळी कवितेतील ओळी प्रत्येक भारतीयाच्या मनातील म्हणणे आहे, असे वाटले. त्यामुळे हे गाणे रेकॉर्ड केले. आज हे गाणे जवानांना व जनतेला समर्पित करत आहे. ही कविता प्रसून जोशी यांची आहे, तर या रचनेला संगीत मयुरेश पै यांनी दिले. या कवितेला स्वरबद्ध केल्यामुळे मोदी यांनी लता मंगेशकर यांचे आभार मानले आहे.संगीतकार मयुरेश पै यांनी सांगितले की, २६ मार्चला या गाण्याचे रेकॉर्डिंग केले. दींदीबरोबर काम करताना आपण किती लहान आहोत याचा अनुभव येतो, त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ९० व्या वर्षी तितक्याच ताकदीने गाणे खूप मोठी गोष्ट आहे.