Join us

अन् मराठी चित्रपटसृष्टी हळहळली; 'तो राजहंस एक' काळाच्या पडद्याआड

By संजय घावरे | Published: July 16, 2023 6:39 AM

१९७५ मध्ये रिलीज झालेल्या किरण शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटात ‘झुंजार माणसा झुंज दे...’ हे गाणे गात महाजनी यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला.

संजय घावरे

मुंबई : ‘खेळ कुणाला दैवाचा कळला...’ हे अजरामर गाणे रवींद्र महाजनी यांच्या गाजलेल्या ‘देवता’ या चित्रपटातील आहे. दुर्दैव म्हणजे हेच गाणे महाजनी यांच्या अखेरच्या क्षणांची गाथा सांगणारे ठरले. पत्नी, मुलगा, सून, नातू या सर्वांपासून दूर एकटेपणाने जीवन जगणाऱ्या महाजनी यांचा मृत्यू झाला हे त्यांच्या कुटुंबीयांनाही समजू नये यापेक्षा दुर्दैव कोणते? महाजनी यांच्या ‘देवता’मधील दैवाचा खेळ खरंच कोणालाही समजणारा नसल्याचे स्मरणच जणू या गाण्याने पुन्हा एकदा करून दिले आहे. महाजनी यांच्या चाहत्यांना हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीही हळहळली आहे.

१९७५ मध्ये रिलीज झालेल्या किरण शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटात ‘झुंजार माणसा झुंज दे...’ हे गाणे गात महाजनी यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘दुनिया करी सलाम’, ‘हळदी कुंकू’, ‘गोंधळात गोंधळ’ या चित्रपटांमध्ये महाजनी यांनी एका पेक्षा एक सरस व्यक्तिरेखा साकारत रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘देवता’ हा संगीतप्रधान चित्रपट माइलस्टोन ठरला. यात आशा काळे, महेश कोठारे, प्रिया तेंडुलकर आदी कलाकारही होते. त्यानंतर आलेल्या ‘मुंबईचा फौजदार’मध्ये महाजनींनी साकारलेला फौजदार जयसिंगराव मोहिते स्मरणात राहणारा ठरला. १९८७ मध्ये रिलीज झालेल्या रमेश देव यांच्या ‘सर्जा’ चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले होते. ‘सतीची पुण्याई’, ‘माळावरचं फूल’, ‘लागेबांधे’, ‘चोराच्या मनात चांदणं’, ‘आंतरपाट’, ‘थोरली जाऊ’, ‘माहेरची माणसं’, ‘ग्यानबाची मेख’, ‘चोरावर मोर’, ‘दुनिया करी सलाम’, ‘लक्ष्मीची पावले’, ‘उनाड मैना’, ‘कळत नकळत’, ‘जगावेगळी पैज’, ‘काय राव तुम्ही’, ‘राखणदार’, ‘जीवा सखा’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’ या चित्रपटांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘बेआब्रू’, ‘तीन चेहरे’, ‘बोलो हे चक्रधारी’, ‘पानीपत’ असे काही हिंदी सिनेमेही केले. १९९२ मध्ये रिलीज झालेल्या ‘आशा पुरामां नी चिंदरी’ या चित्रपटासोबतच ‘राज’, ‘भद्रकाली’ अशा १० गुजराती चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. ‘तो राजहंस एक’ यांसारख्या काही नाटकांतही ते दिसले. 

नायक    ते    खलनायक...

 महाजनी यांनी आयुष्यभर एक चार्मिंग हीरो म्हणून नावलौकिक मिळावला, पण त्यांनी साकारलेल्या खलनायकानेही रसिकांच्या उरात धडकी भरवली होती. ‘जीवा सखा’ या चित्रपटात महाजनी यांनी साकारलेला खलनायक अनेकांच्या स्मरणात राहणारा ठरला. 

  १९९१ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश देव यांनी केले होते, तर यात महाजनींसोबत अजिंक्य देव, वर्षा उसगावकर, सीमा देव, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, आशुतोष गोवारीकर, स्वप्निल जोशी, किशोरी शहाणे, माधव अचवाल, अजय वाधवकर, राजा मयेकर, वसंत इंगले, गजानन फुलारी, किरण नाबर, शिवाजी बोडखे, मधु आपटे, श्रीकृष्ण फुलारी, राजेश पतंगे, मिलिंद राज, सुरेश अहिरे, रमेश मल्लिक अशी भलीमोठी स्टारकास्ट होती. 

बाप-बेटा एकत्र आले२०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘पानीपत’मध्ये रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी या बाप-बेट्यांना एकत्र आणण्याची किमया दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी साधली. या चित्रपटात रवींद्र महाजनी यांनी मल्हारराव होळकरांची भूमिका साकारली आहे. या निमित्ताने रवींद्र आणि गश्मीर महाजनी प्रथमच एकाच चित्रपटात दिसले.

बाप-लेक दोघेही छत्रपती‘सर्जा’ या चित्रपटात रवींद्र महाजनींनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले होते. वडिलांच्या पुढे एक पाऊल पाऊल टाकत ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात गश्मीर महाजनीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत संभाजी महाराज अशा दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्या.

हिंदीतून ऑफर्स आल्या पण...‘बेआब्रू’ चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाल्यानंतर महाजनी यांना हिंदीत काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या, पण या चित्रपटात नायिकेवर अत्याचार होतो आणि ती सूड घेते अशी कथा होते. त्यामुळे महाजनींना तशाच प्रकारच्या चित्रपटांच्या ऑफर्स  येऊ लागल्याने त्यांनी नकार दिला. 

एन. चंद्रा यांनी त्यांना ‘अंकुश’ सिनेमासाठी विचारले होते, पण मानधनावरून न जमल्याने त्यांनी नकार दिल्याचे बोलले जाते. या सुपरहिट चित्रपटात जर त्यांनी काम केले असते तर ते हिंदीतही खूप लोकप्रिय झाले असते.

... आणि दुखापत झालीकोल्हापूरमध्ये ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलमध्ये रवींद्र महाजनी आणि दरोडेखोरांमध्ये मारामारीचे दृश्य होते. हे दृश्य वास्तवदर्शी वाटावे यासाठी दरोडेखोर बनलेल्या कलाकारांच्या हाती खऱ्या कुऱ्हाडी देण्यात आल्या होत्या. महाजनींनी दिग्दर्शकाला खरी कुऱ्हाड न वापरण्याची सूचना केली होती. खरी कुऱ्हाड हाताला लागल्यास दुखापत होऊ शकते, असे महाजनी यांचे म्हणणे होते, पण दिग्दर्शकांनी ऐकले नाही. सीन शूट करताना दरोडेखोर बनलेल्या कलाकाराकडील कुऱ्हाडीचा घाव महाजनी यांच्या हातावर बसला आणि महाजनी यांच्या हातातून रक्ताची धार लागल्याने संपूर्ण सेटवर रक्त पसरले होते.

श्रद्धांजली

‘सर्जा’, ‘जीवा सखा’ आणि ‘राखणदार’ या तीन चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य मला लाभले. ‘सर्जा’मध्ये त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. खूप चांगला माणूस असलेल्या एका गुणी कलावंताचे जीवन अशाप्रकारे समाप्त झाल्याचे समजल्यावर खूप दु:ख झाले.    - अजिंक्य देव, अभिनेतेआमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेल्याचे खूप दु:ख वाटते. तो हिरो आणि मी साईडला असे आम्ही बरेच चित्रपट एकत्र केले आहेत. एक चांगला माणूस व चांगला मित्र गेल्याचे खूप दुःख आहे. माझा मित्र तर गेलाच; पण सोबतच एक चांगला नट गमावल्याचे दुःख मनात कायम राहील.     - अशोक सराफ, अभिनेतेरवींद्र महाजनी आणि मी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही, पण त्यांनी माझ्या वडिलांच्या ‘चोरावर मोर’ या चित्रपटात काम केले आहे. त्यावेळी सिनेमाच्या सेटवर आमची भेट व्हायची. खूप हसरा असा हँडसम हिरो मराठी चित्रपटसृष्टीला लाभला होता.      - सचिन पिळगावकर, अभिनेतेमराठी रंगभूमीवरील ‘मृत्युंजय’ या बहुचर्चित नाटकामध्ये रवींद्र महाजनीने कर्णाची भूमिका साकारली होती. त्या व्यक्तिरेखेबाबत मी म्हणेन की, असा देखणा कर्ण पुन्हा होणे नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील एक देखणा हिरो हरपला. आम्ही एकत्र खूप काम केले आहे. तो खूप उत्तम अभिनेता होता.     - उषा नाईक, ज्येष्ठ अभिनेत्री 

ह. रा. महाजनींचे पुत्रज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी यांचे रवींद्र महाजनी हे पुत्र होत. मात्र, पत्रकारितेत न जाता त्यांनी आपल्या पायावर उभे राहाण्यासाठी सुरुवातीला चक्क टॅक्सी चालक म्हणूनही काम केले होते. 

टॅग्स :रवींद्र महाजनीमराठी अभिनेता