'अंदाज अपना अपना' हा बॉलिवूड सिनेमा इतक्या वर्षांनंतरही सोशल मीडियावर गाजतोय. सिनेमाच्या छोट्या छोट्या क्लिप्स व्हायरल होत असतात. अनेक चाहते तर सिनेमाच्या सिक्वलची मागणी करत आहेत. पण तुम्हाला माहितीए का 1994 साली जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा तो बॉक्सऑफिस चाललाच नव्हता. एक दोन दिवसातच सिनेमा थिएटरमधून बाहेर गेला होता.
राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाने त्या काळी बॉक्सऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. याचं कारण स्वत: संतोषी यांनी एका मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले," लोकांचं सिनेमाकडे लक्ष गेलं नव्हतं. तेव्हा सलमान खानचा मैने प्यार किया हिट झाला होता त्यामुळे त्याची प्रतिमा रोमँटिक हिरोची झाली होती. आमच्या सिनेमात रोमान्स होताच पण त्याहून जास्त कॉमेडी, ह्यूमर, अॅडव्हेंचर होतं. तेव्हाच्या काळी अशा विषयावर सिनेमा बनलाच नव्हता. लोकांना फिल्म कळायलाच वेळ लागला. आज २५ वर्ष झाली आहेत. तेव्हा तर डिस्ट्रिब्युटर्सही नव्हते जे लोकांपर्यंत पोहोचले असते."
ते पुढे म्हणाले,"जेव्हा एखादा सिनेमा रिलीज होतो तेव्हा प्रमोशन आणि रिलीजच्या वेळेस कलाकार मुंबईतच असतात. मात्र त्यावेळी ना आमिर होता ना सलमान. मी सुद्धा दुसऱ्या शहरात शूट करत होतो. आमचा ना माध्यमांशी संपर्क होता ना कोणतं प्रमोशन झालं. जी पब्लिसिटी करायची होती ती आम्ही केलीच नाही.यामुळे डिस्ट्रिब्युटर्सही नाराज होते. पण त्या फिल्मचं नशीबच होतं. ती आपल्या मेरिटवर चालली."
रिमेक संदर्भात संतोषी म्हणाले, "रिमेकसारखं तर काही त्या सिनेमाचं होऊ शकत नाही. सिनेमा आजही अगदी फ्रेश वाटतो. जो त्याचा रिमेक करेल पडेल. त्या सिनेमासारखं पु्न्हा बनवणं अशक्य आहे."