सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या तांडव या वेबसिरिजची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून ही वेबसिरिज कधी प्रदर्शित होत आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. ही वेबसिरिज आता प्रदर्शित झाली असून या वेबसिरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान, यापुढे चित्रपट विश्वातील लोकांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्यास त्यांना भरचौकात जोड्यानं फटकावलं जाईल, असं कदम म्हणाले. "कोणत्याही परिस्थितीत तांडव या वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येईल. त्या सीरिजचे अभिनेते दिग्दर्शकांवर एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यांनी हिंदू देवीदेवतांचा अवमान करण्याचं कृत्य केलं आहे. त्यांनी हात जोडून, गुडघे टेकून समस्त देशाची आणि हिंदू समजाची माफी मागायला हवी. भविष्यात चित्रपट विश्वातील लोकांकडून अशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अवमान झाल्यास त्यांना भरचौकात जोड्यानं फटकावू," असा इशारा राम कदम यांनी दिला. राम कदम यांनी तांडव या वेब सीरिजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. "तांडव या वेब सीरिजमध्ये असलेल्या दृश्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अली अब्बास तांडव वेब सीरिजचा दिग्दर्शक असून डाव्या विचारसरणीच्या अजेड्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. झीशाननं या ठिकाणी भगवान शिव यांचा अवमान केला आहे. दरम्यान, मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी आणि त्वरित गुन्हा नोंदवला जावा," असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
... तर भर चौकात जोड्यानं मारू; राम कदम यांचा इशारा
By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 4:20 PM
माफी मागेपर्यंत वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा यापूर्वी दिला होता इशारा
ठळक मुद्देकदम यांनी घाटकोपर पोलिसांत दाखल केली तक्रारनिर्माते, दिग्दर्शक, कलाकारांनी हात जोडून माफी मागण्याचा इशारा