बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचं निधन होऊन आज बराच काळ लोटला. मात्र, तिच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात. यात बोनी कपूरदेखील कायम आपल्या पत्नीचे फोटो, व्हिडीओ शेअर करुन तिच्या आठवणी शेअर करत असतात. यात सध्या श्रीदेवीविषयी असाच एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. एकेकाळी श्रीदेवीमुळे बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्यात जोरदार भांडण झालं होतं.
श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या 'मिस्टर इंडिया' या चित्रपटाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटादरम्यान, दोन्ही भावंडांमध्ये जबरदस्त वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की अनिल कपूरने चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर सोडलं होतं.
या कारणामुळे झालं दोघा भावांमध्ये भांडण
'मिस्टर इंडिया'मध्ये श्रीदेवीला लीड रोलमध्ये घ्यावं अशी बोनी कपूर यांची प्रचंड इच्छा होती. परंतु, श्रीदेवीने या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. त्यामुळे बोनी कपूर यांनी तिची फी वाढवली होती. श्रीदेवीने १० लाखांचं मानधन मागितलं होतं. त्याऐवजी बोनी कपूर यांनी ११ लाख रुपये मानधन दिलं होतं. यावरुन दोन सख्ख्या भावांमध्ये वाद सुरु झाला होता.
अनिल कपूर यांनी स्वत: या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे बोनी कपूर यांनी अनावश्यक खर्च केल्यामुळे अनिल प्रचंड संतापला. यामध्येच श्रीदेवीच्या आईवर अमेरिकेत उपचार करता यावे यासाठी बोनी कपूर यांनी तिला विमानाची तिकीटहं काढून दिली, त्यामुळे अनिल कपूर यांच्या रागाचा पारा चांगलाच वाढला. त्यामुळे त्यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला होता.
दरम्यान, यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी अनिल कपूर यांची समजूत घातली. परंतु, निर्मितीची सगळी सूत्र आपल्या हातात मिळाल्यावरच राहिलेलं चित्रीकरण पूर्ण करेन अशी अट अनिल कपूर यांनी घातली.