लवकरच 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन सुरु होणार आहे. 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खान नव्या सीझनची सूत्रं सांभाळणार नाहीये. सलमानऐवजी बॉलिवूडमधले लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३' च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यानिमित्ताने अनिल यांनी लोकमत फिल्मीसोबत केलेली 'झक्कास' बातचीत
>> देवेंद्र जाधव
* 'बिग बॉस ओटीटी 3' ची ऑफर कशी मिळाली? ऑफर स्विकारण्यामागचे कारण काय?
जेव्हा मला बिग बॉसची ऑफर मिळाली तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. मला ही ऑफर कशी मिळाली? हा प्रश्न माझ्याही मनात आला. माझ्या आयुष्यात यापूर्वीही अशा अनपेक्षित ऑफर मिळाल्या आहेत. जेव्हा मला 'मशाल' सिनेमा मिळालेला याशिवाय 'स्लमडॉग मिलेनियर', 'ॲनिमल', 'नाईट मॅनेजर', 'फायटर' अशा वेगळ्या कलाकृतींमध्ये काम करण्याची संधी आली. तेव्हाही मलाच ही ऑफर का मिळाली? असं अनेकदा मनात आलं. बिग बॉसच्या वेळीही असंच झालं. ही मोठी ऑफर घेऊन माझ्याकडे कसे आले? हा प्रश्न वारंवार पडला. पण मनातून मात्र आनंद झाला. उत्सुकता होती. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट आहे. एक चॅलेंज आहे. मी याआधी असं काही केलं नाही. त्यामुळे करून बघुया असं ठरवलं. पुढे बघू काय होतंय!
* सलमान खानने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलेला बिग बॉस शो होस्ट करताना कोणती आव्हानं?
संपूर्ण जगात 'बिग बॉस' शो फेमस आहे. भारतात हा शो खूपच जास्त लोकप्रिय आहे. सलमान खान त्यामागचं मुख्य कारण आहे. कधी असंही घडतं की, तुम्हाला आयुष्यात नवीन गोष्ट करायला मिळते. जसं की, मी '24', 'द नाईट मॅनेजर' अशा वेबसीरिजमध्ये अभिनय केला. या वेबसीरिज ज्यावर आधारीत आहेत अशा मूळ कलाकृतींचं जगभरात फॅन फॉलोईंग आहे. मला जेव्हा भारतात या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळते तेव्हा एक प्रकारची जबाबदारी असते. लोक याविषयी सोशल मीडियावर बोलतात, चर्चा करतात. त्यामुळे एवढा विचार नाही करायचा. बिनधास्त करायचं. सर्वांची आपापली कामाची पद्धत आहे. त्यामुळे देवाचं नाव घेऊन 'जय बजरंगबली', 'जय महाराष्ट्र' म्हणत मैदानात उभं राहायचंय.
* बिग बॉसच्या फॉरमॅटनुसार हसतमुख असणारे अनिल कपूर रागावताना बघायला मिळणार?
माझ्या सिनेमात तुम्ही मला रागवताना बघितलं नाही का? 'ॲनिमल' मध्ये तुम्ही बघितलं असेल की, रणबीर कपूरवर कसा रागावतो मी! त्याला एकामागून एक थापड मारतो. असं काही मी बिग बॉसमध्ये करणार नाही. बिग बॉसचा जो फॉरमॅट आहे त्यानुसार तुम्हाला फर्म आणि फेयर असलं पाहिजे. कधीकधी काय होतं की, आपण माणसं आहोत तर आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत. याशिवाय काही उणीवा सुद्धा दिसून येतात. आपण सर्व आयुष्यात चुका करतो. बिग बॉससारख्या शो मध्ये वावरताना तुमच्या डोक्यावर खूप जास्त प्रेशर असतं. अशावेळी काही जणं जास्त चुका करु शकतात. मला या सर्व गोष्टी माझ्या अनुभवातून बघाव्या लागतील. काही वेळेस स्पर्धकांना सहानुभूती द्यावी लागेल. घरात शिस्त ठेवावी लागेल.
* जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल?
'बहुत हो गया रे झकास, अब करते है कुछ खास.. अब सब बदलेगा.' जय महाराष्ट्र ! झकास. नक्की बघा 'बिग बॉस ओटीटी 3'
(Bigg Boss OTT 3 #AbSabBadlega २१ जूनपासून JioCinema Premium वर रात्री ९ वाजता बघू शकता.)