अनिल कपूर ‘फन्ने खां’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी अनिल ‘रेस3’मध्ये दिसला होता. ‘रेस3’ची बॉक्सआॅफिसवर काय गत झाली, तर तुम्हाला ठाऊक आहेच. सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस अशी तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट दणकून आपटला होता. ‘रेस3’ला समीक्षकांनी फार दाद दिली नव्हती. पण केवळ सलमानच्या चाहत्यांमुळे पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने तग धरला होता. ‘रेस3’ची ही गत बघून अनिलच्या काय भावना होत्या? हा चित्रपट त्याने काय विचार करून साईन केला होता? असे प्रश्न कुण्याच्याही मनात निर्माण होणे साहजिक आहेत. एका ताज्या मुलाखतीत अनिलला नेमके हेच प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावर त्याने कुठलीही बनवाबनवी न करता अगदी स्पष्ट उत्तर दिले. होय, अनिलने अगदी शुद्ध व्यावसायिक हेतूने हा चित्रपट साईन केला होता. तो साईन करताना चित्रपटाच्या यशापशाचे कुठलेही ठोकताळे त्याच्या मनात नव्हते.तू ‘रेस3’ का साईन केला होतास? असा प्रश्न त्याला केला गेला, यावर पैशांसाठी असे हसत हसत त्याने सांगितले. मी कुठलाही चित्रपट साईन करताना पैशांबद्दल विचार करतो. अभिनय माझा व्यवसाय आहे. पोटापाण्यासाठी मी हे काम करतो. अधिकाधिक पैसे कमवण्यावर लक्ष देणार नाही तर मी तगणार कसा? माझी बायको मला घरात घेणे बंद करेल. त्यामुळे पैसा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असे अनिल म्हणाला. आता अनिलचे हे म्हणणे विनोद म्हणून घ्यायचे की त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून मान्य करायचे, अर्थातचं हा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा.तुम्हाला ठाऊक असेलचं की, अनिल कपूरने ‘रेस’च्या तिन्ही सीरिजमध्ये काम केले आहे. ‘रेस’चे पहिले दोन पार्ट लोकांना आवडले़ पण ‘रेस3’ने प्रेक्षकांची निराशा केली. विशेषत: सलमान खानच्या खात्यात या चित्रपटाने एका फ्लॉपची भर घातली.