Join us

अनिल कपूरला या प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचे आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 3:59 PM

अनिल कपूरला एका क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे

ठळक मुद्देकोणत्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे नुकतेच अनिल कपूरला एका मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले होते. यावर मला सचिन तेंडुलकरच्या बायोपिकमध्ये काम करायला आवेडल असे त्याने सांगितले.

अनिल कपूरने बेटा, लम्हे, जमाई राजा, 1942 : अ लव्ह स्टोरी, जुदाई, आपके दिल मे रहते है, रेस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनिल कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरी तो आजही एखाद्या तरुण मुलासारखाच दिसतो. आजच्या तरुण अभिनेत्यांना लाजवेल अशी त्याच्यात एनर्जी आहे. त्यामुळे अनिल कपूरचे नेहमीच कौतुक केले जाते. 

अनिल कपूरचा एक लडकी को देखा तो ऐसा लगा हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील अनिलची भूमिका त्याच्या फॅन्सना चांगलीच भावली होती. अनिल कपूरने आजवर खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अनिल कपूरला एका क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे आणि हा क्रिकेटर दुसरा कोणी नव्हे तर क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकर आहे. आएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, कोणत्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे नुकतेच अनिल कपूरला एका मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले होते. यावर मला सचिन तेंडुलकरच्या बायोपिकमध्ये काम करायला आवेडल असे त्याने सांगितले. त्याने मुलाखतीत सांगितले की, मी सचिन तेंडुलकरचा खूपच मोठा फॅन आहे. 

अनिल कपूर केवळ सचिनचाच नव्हे तर क्रिकेट या खेळाचाच फॅन आहे. तो कामात कितीही व्यग्र असला तरी तो क्रिकेट पाहायला वेळ काढतो. लवकरच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू होणार आहे. अनिल कपूरने त्याच्या या मुलाखतीत आयपीएलमधील त्याच्या आवडत्या टीमविषयी देखील सांगितले. तो म्हणाला, इतर भारतीयांप्रमाणे मी देखील क्रिकेटचा खूप मोठा फॅन आहे. मी भारताच्या मॅचेस आवर्जून पाहातो. लवकरच सुरू होणाऱ्या आयपीएलची मी आतुरतेने वाट पाहात आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स ही माझी आवडती टीम आहे. 

  

टॅग्स :अनिल कपूरसचिन तेंडुलकर