'ॲनिमल' सिनेमाची क्रेझ काही केल्या संपत नाहीये. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा सिनेमा काहींच्या पसंतीस उतरला. तर अनेकांनी सिनेमातील काही सीन्स आणि संवादामुळे 'ॲनिमल'ला ट्रोलही केलं. संदीप वांगा रेड्डीच्या 'ॲनिमल' सिनेमात दाखविण्यात आलेल्या रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या पुरुषी अहंकार आणि महिलांबरोबरच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही 'ॲनिमल' सिनेमावर टीका केली होती.
'ॲनिमल' सिनेमाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. संदीप रेड्डींनी कंगनाचं कौतुक केलं. ते म्हणाले, "जर ती एखाद्या भूमिकेसाठी फिट बसत असेल तर मी तिला नक्कीच कथा ऐकवेन. मला क्वीनमधलं तिचं काम आवडलं. त्यामुळे तिने 'ॲनिमल' बाबत नकारात्मक कमेंट केली असेल, तरी मला काही वाटत नाही. तिचं काम मी बघितलं आहे, त्यामुळे मला वाईट वाटतं नाही." संदीप रेड्डींच्या या वक्तव्यानंतर कंगनाने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.
कंगना म्हणते, "परीक्षण करणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक कलेचं परीक्षण आणि चर्चा झाली पाहिजे. मी केलेल्या समीक्षेचा संदीप यांनी आदर केला. ते फक्त मर्दानी चित्रपट बनवत नाहीत, तर त्यांचं वागणंही मर्दानी आहे, असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद सर."
"पण, कृपा करून मला कोणतीही भूमिका देऊ नका. नाहीतर तुमचे अल्फा मेल हिरो स्त्रीवादी होऊन जातील. आणि मग तुमचे चित्रपटही आपटतील. तुम्ही ब्लॉकबस्टर सिनेमे बनवा. सिनेइंडस्ट्रीला तुमची गरज आहे, " असंही पुढे तिने म्हटलं आहे.