'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमातरणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. पण, बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणं तृप्तीसाठी सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं.
तृप्तीने 'ॲनिमल' आधी लैला मजनू, बिलकुल, काला यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. नुकतीच इन्स्टंट बॉलिवूडला मुलाखतीत ती म्हणाली, "काम मिळाल्यानंतरही इथे खूप संयम ठेवावा लागतो. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मी घर सोडलं आणि मुंबईत आले. माझ्या आईवडिलांना माझा हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळेच मुंबईत असताना मी त्यांच्याकडे पैसे मागू शकत नाही, हे मला माहीत होतं. तू तिथे राहू शकत नाहीस, परत ये...असं ते मला म्हणायचे. त्यामुळे अशीही वेळ होती, जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते."
"माझे मित्रमैत्रिणी आणि बहिणींनी या काळात मला मदत केली. तेव्हा मी खूप ऑडिशन द्यायचे. अंधेरीमध्ये एक बिल्डिंग होती. तिथे ऑडिशन्स व्हायच्या. मी तिथे प्रत्येक मजल्यावर ऑडिशन्स द्यायचे," असंही पुढे तृप्ती म्हणाली. दरम्यान, 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने ११ दिवसांत तब्बल ४४३ कोटींचा गल्ला जमवला आहे.