मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाचा डंका वाजवणारे अभिनेते म्हणजे उपेंद्र लिमये. 'पेज ३', 'सरकार राज', 'अंतिम : द फायनल ट्रुथ' अशा सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांत काम केल्यानंतर आता 'अॅनिमल'मधील त्यांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 'अॅनिमल'मध्ये उपेंद्र लिमयेंनी फ्रेडी हे पात्र साकारलं आहे. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'अॅनिमल'मधील उपेंद्र लिमयेंचे सीन्सही व्हायरल झाले आहेत. 'अॅनिमल'च्या निमित्ताने उपेंद्र लिमयेंनी 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांचा किस्साही सांगितला. उपेंद्र लिमये यांनी 'सरकार राज' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं होतं. यावेळचा किस्सा त्यांनी सांगत ते म्हणाले, "सरकार राज सिनेमात ज्याला व्हिलन म्हणून घेण्यात आलं होतं. त्याला बच्चन साहेब समोर आले तेव्हा काम करता येत नव्हतं. त्यामुळे शूटिंगचा एक दिवस वाया गेला होता. अमिताभ बच्चन करत असलेल्या सिनेमाचा एक दिवस वाया गेल्यानंतर काय झालं असेल, याची कल्पना आपण करू शकतो."
"त्यानंतर मग राम गोपाल वर्माने या भूमिकेसाठी मी चांगला अभिनेता शोधून आणेन, असं बच्चन साहेबांना प्रॉमिस केलं होतं. आणि मग त्याने मला फोन केला. भेट आणि शूटिंग छान झालं. पण, त्यानंतर रामूने फक्त अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यासाठी ठेवलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला मलाही बोलवलं होतं. ते स्क्रिनिंग झाल्यानंतर मग अमिताभ बच्चन यांनी मला मिठी मारली. तू खूप चांगलं काम केलंस, असं ते मला म्हणाले. ती मिठी एका नॅशनल अवॉर्डसारखी होती. बिग बींनी प्रेमाने जवळ घेऊन कौतुक करणं...यामुळे पुढचं काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते," असंही पुढे उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.
दरम्यान, 'ॲनिमल'मध्ये उपेंद्र लिमयेंनी रणबीरला शस्त्र पुरविणाऱ्या फ्रेडीची भूमिका साकारली आहे. शस्त्रांचा डिलर असलेल्या फ्रेडीच्या कॉमेडीने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला रंगत आणली आहे. या सिनेमात उपेंद्र लिमयेंनी रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्यांनी साकारलेली छोटेखानी भूमिका लक्षवेधी ठरत आहे.