'ॲनिमल' या चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेला रणबीर कपूरचा 'ॲनिमल' सिनेमा प्रदर्शनाच्या १२ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमातील काही सीन्सची प्रचंड चर्चा रंगली आहे. 'ॲनिमल'मधील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बॉबी देओल अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी देओलने 'ॲनिमल'मधील एका सीनबद्दल भाष्य केलं आहे.
'ॲनिमल'मधील रणबीर कपूरच्या इंटिमेट सीन्सची सोशल मीडिया चर्चा रंगली आहे. तर बॉबी देओलच्या काही सीन्सला ट्रोलही केलं जात आहे. 'ॲनिमल'च्या क्लायमॅक्समध्ये रणबीर आणि माझा किसिंग सीन होता, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने केला आहे. 'ॲनिमल'मध्ये रणबीर कपूरने रणविजय तर बॉबीने अबरार हक हे पात्र साकारलं आहे. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये रणविजय आणि अबरार एकमेकांना किस करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. परंतु, संदीप रेड्डींनी तो सीन काढून टाकल्याचा खुलासा बॉबीने 'द क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
संदीप रेड्डींनी सिनेमातील अबरारच्या पात्राचं वर्णन केल्याचं सांगताना बॉबी म्हणाला, "सिनेमात हे दोन भाऊ आहेत, जे एकमेकांचा खून करू इच्छितात. पण, त्यांना एकमेकांबद्दल प्रेमही आहे. क्लायमॅक्समध्ये बॅकग्राऊंडला दोघांमधील प्रेम दर्शवणारं गाणं टाकून एक सीन शूट करणार आहे.तुम्ही दोघं एकमेकांशी लढत आहात. आणि मध्येच तू त्याला किस करतो. आणि त्यानंतर तू गिव्ह अप करत नाहीस. मग तो तुला मारून टाकतो, असं संदीप रेड्डी म्हणाले होते. 'ॲनिमल'च्या क्लायमॅक्समध्ये रणबीर आणि मी एकमेकांना किस करत असल्याचा सीन होता. पण, संदीप रेड्डींनी तो काढून टाकला. मला वाटतं नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाच्या अनकट व्हर्जनमध्ये तो सीन असेल."
दरम्यान, 'ॲनिमल'मध्ये रणबीर आणि बॉबी देओलबरोबरच रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाने १२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ४५८ कोटींची कमाई केली आहे.