'ॲनिमल' हा बिग बजेट बॉलिवूड सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. संदीप वांगा रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. सध्या जिकडेतिकडे या सिनेमाचीच चर्चा होताना दिसत आहे. पण, यातील काही सीन्सवरुन चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. यावर आता चित्रपटात फ्रेडीची भूमिका साकारलेल्या उपेंद्र लिमये यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात मराठी अभिनेते उपेंद्र लिमयेंनी छोट्याशा भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमयेंनी 'ॲनिमल'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. याबरोबरच हिंसा आणि चित्रपटातील वादग्रस्त सीन्सवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, "'ॲनिमल'मध्ये दाखवलेले सीन्स गरजेचे आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. माझ्या कुटुंबीयांच्या किंवा काही मित्रांच्याही 'आम्हाला त्यातील काही गोष्टी झेपल्या नाहीत' अशा प्रतिक्रिया होत्या. आणि ते असूही शकतं. कारण, सगळ्यांनाच आवडेल अशी कलाकृती निर्माण करणं अवघड आहे."
"अशा टाइपचा सिनेमा तू करू नकोस, असे बोलणारेही मला भेटतील. पण, मला त्याचं काही वाटत नाही. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. एका सुपरस्टारने 'कंटेट नसेल तर सेक्स आणि हिंसेचा आधार घ्यावा लागतो', अशी कमेंट केली आहे. पण, याच्याशी मी सहमत नाही. त्यापलीकडे जाऊन तुम्ही या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. ज्याप्रकारे त्याने काम केलं आहे. पण, प्रत्येकाला ते आवडलेच असं नाही," असंही ते म्हणाले.
संदीप वांगा रेड्डी यांच्या 'ॲनिमल' सिनेमात उपेंद्र लिमयेंनी रणबीरला शस्त्र पुरविणाऱ्या फ्रेडीची भूमिका साकारली आहे. शस्त्रांचा डिलर असलेल्या फ्रेडीच्या कॉमेडीने चित्रपटातील 'ॲक्शन सीन्सला रंगत आणली आहे. या सिनेमात उपेंद्र लिमयेंनी रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्यांनी साकारलेली छोटेखानी भूमिका लक्षवेधी ठरत आहे.