Join us

किरण मानेंबाबत अनिता दाते पुन्हा व्यक्त झाल्या, ट्रोलर्सना खडेबोल सुनावत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:32 AM

Kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढल्याच्या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मनोरंजन क्षेत्रापासून राजकारणापर्यंत वाद सुरू आहेत. अभिनेत्री अनिता दाते यांनीही या विषयी आपले मत मांडले होते. त्यानंतर आता या विषयावर अनिता दाते व्यक्त झाल्या आहेत.

मुंबई - अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढल्याच्या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मनोरंजन क्षेत्रापासून राजकारणापर्यंत वाद सुरू आहेत. या विषयावरून अनेक क्षेत्रातील मंडळी व्यक्त होत आहेत. दरम्यान, अभिनेत्री अनिता दाते यांनीही या विषयी आपले मत मांडले होते. त्यानंतर आता या विषयावर अनिता दाते व्यक्त झाल्या आहेत.

अनिता दाते म्हणाल्या की, मागिल 4 दिवसा पासून किरण माने हे कोणतेही कारण न देता मालिकेतून काढून टाकण्यात आले, असे ते सातत्याने विविध माध्यमातून सांगत होते. कलाकाराला त्याला त्याचे काम काढून घेताना ते का काढून घेतले हे विचारतोय तर ते त्याला सांगण्याचे सौजन्य त्या संस्थांनी दाखवले पाहिजे. ही माझी कलाकार म्हणून असलेली अपेक्षा मी मांडली होती.

आज स्टार प्रवाह ह्या वाहिनीने  किरण माने यांना त्याच्या गैरवर्तणुकीमुळे काढले. त्यांना त्या आधी समज दिली होती. हे देखील सांगितले. तसेच ,आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो हे स्पष्ट केलं ह्या बद्दल मी कलाकार म्हणून त्याचे मनापासून आभार मानते.आपले विचार नेहमीच योग्य पध्दतीने आपण मांडले पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न देखील विचारले पाहिजेत. कोणतीही दडपशाही नसावी असेच मला वाटते, असे त्या म्हणाल्या. 

यावेळी त्यांनी ट्रोलर्सनाही खडेबोल सुनावले, त्या म्हणाल्या की, काल पासून माझ्या पोस्ट वरील प्रतिक्रिया वाचतांना मला अजून काही गोष्टी जाणवल्या. जसे की  -सभ्यता फार कमी लोकात असते. -शिवी देणे चुकीचे आहे, असं म्हणणारा माणूस त्याच वाक्यात शिवी देऊ शकतो.-अनेक माणसे सभ्य भाषेत धमकी देतात. -कोणी ब्राम्हण विरोधी बोलत असेल तर ब्राम्हण स्त्री ने त्याला सपोर्ट करायचा नसतो. त्या साठी टक्याची भाषा वापरतात.-काय चूक काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा आपण आपल्या जाती च्याच बाजूने बोलायला हवं. -जात आता आम्ही मानत नाही असं म्हणताना छुप्या पद्धतीने जात मानायची असते .- अश्या अनेक गोष्टी ह्या नंतर देखील मला प्रतिक्रियांमध्ये वाचायला मिळतील. माणूस म्हणून मला समृध्द होण्यासाठी फारच मदत होईल. 

टॅग्स :अनिता दातेकिरण माने