टेलिव्हिजन इंडस्ट्री ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच 'बागी ३' चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
मालिकेत काम करताना तू बॉलिवूडमध्ये काम करायचे ठरविले होतेस का?लहानपणापासूनच मला बॉलिवूडमध्ये काम करायचं होतं. त्यात अभिनयात करियर करायचे माझे नक्की होते. मला 'पवित्र रिश्ता' मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील अर्चनाच्या भूमिकेतून मला खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर मला वाटलं की आता बॉलिवूडकडे वळले पाहिजे. बॉलिवूडमध्ये जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आणि मला 'मणिकर्णिका' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
'मणिकर्णिका' चित्रपटात काम करण्याची संधी तुला कशी मिळाली?कमल जैन यांना मी माझा भाऊ मानते. निर्मिती असलेला 'मणिकर्णिका' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यांनी मला झलकारी बाईची भूमिका तू करावीस असे सांगितले. त्यामुळे त्यांना मी नाही म्हणू शकले नाही आणि मलादेखील इतकी मोठी संधी सोडायची नव्हती. ही संधी मला मिळाली त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.
'बागी ३' चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल सांग ?'बागी ३' चित्रपटात मी रूचीची भूमिका साकारली आहे. ती चांगली मुलगी आहे. ती तिच्या प्रत्येक कामामध्ये खूप चोख असते. तिचे सर्वांनी ऐकलं पाहिजे नाहीतर ती सगळ्यांवर रागवते. खऱ्या आयुष्यातही मी थोडीफार तशीच आहे.
या चित्रपटातील सहकलाकारांबद्दल काय सांगशील?रितेश खूप छान व्यक्ती आहे. मी त्याला एकदा दोनदा पार्टीजमध्ये भेटले होते. रितेश एकदा त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी पवित्र रिश्ताच्या सेटवर आला होता. तेव्हा मी पहिल्यांदा भेटले होते. त्याच्यासोबत बागी ३मध्ये काम करायला खूप मजा आली. त्याला अभिनयाचा इतका दांडगा अनुभव आहे. तो खूप नॅचरल अभिनय करतो. त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली. टायगर त्याच्या कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे. त्याला काय सादर करायचे आहे ते बरोबर माहित आहे. तसेच तो माणूस म्हणूनही खूप चांगला आहे. तो थोडासा लाजाळू आहे. पण एकदा तो कम्फर्टेबल झाला की मग तो छान मिसळतो. श्रद्धासोबत काम करायला खूप मजा आली. आमची खूप छान बॉण्डिंग झाली आहे. सेटवर आम्ही खूप गप्पा मारायचो. चिंच, कैऱ्या खायचो. त्यामुळे आम्ही खूप धमालमस्ती केली.
सेटवर तू, श्रद्धा आणि रितेश मराठीत गप्पा मारायचात, हे खरं आहे का?हो. 'बागी ३'च्या सेटवर खूप मराठी वातावरण होते. त्यात टायगरच असा एक होता ज्याला मराठी कळायचं पण बोलता येत नव्हतं. त्यामुळे आम्ही तिघे मराठीत गप्पा मारायचो.
मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करण्याचा काही विचार आहे का?नक्कीच मला मराठीत काम करायला आवडेल.पण सध्यातरी मला बॉलिवूडमध्ये जम बसवायचा आहे. मग त्यानंतर मला नक्कीच मराठीत काम करायला आवडेल. मला आता एकीकडेच लक्ष केंद्रीत करायचं आहे.
तुझा या वर्षात लग्न करण्याचा प्लान आहे का ?गेल्या १० वर्षांपासून माझ्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. सध्या तरी माझा काही लग्नाचा प्लान नाही. ठरले की सांगेन.